ICU साठी 4 ते 7 हजार, व्हेंटिलेटरसाठी 9 हजारापर्यंत दर, कोरोना उपचारासाठी सरकारकडून दर जाहीर

| Updated on: Jun 01, 2021 | 9:31 PM

सर्वसामान्यांना दिलासा देण्याच्या दृष्टीकोनातून खासगी रुग्णालयांच्या उपचाराचे दर निश्चित करण्यात आले आहेत. (Corona treatment new rates Uddhav Thackeray)

ICU साठी 4 ते 7 हजार, व्हेंटिलेटरसाठी 9 हजारापर्यंत दर, कोरोना उपचारासाठी सरकारकडून दर जाहीर
Follow us on

मुंबई : कोरोना संसर्गाच्या दुसऱ्या लाटेचा तडाखा ग्रामीण भागाला बसला आहे. असे असताना कोविड उपचारांसाठी खासगी रुग्णालयांमध्ये वारेमाप खर्च लागतोय. हे थांबविण्यासाठी आणि सर्वसामान्यांना दिलासा देण्याच्या दृष्टीकोनातून खासगी रुग्णालयांच्या उपचाराचे दर निश्चित करण्यात आले आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे(Uddhav Thackeray) यांनी त्याबाबतच्या अधिसूचनेला मंजुरी दिली आहे. यानुसार आता शहरांचे वर्गीकरण करून दर निश्चित केले जाणार आहेत. यात निश्चित दरांशिवाय अधिक दर आकारता येणार नाहीत. (new rates for Corona treatment announced by Maharashtra government Uddhav Thackeray ordered to follow strictly)

या अधिसूचनेची काटेकोर आणि परिणामकारक अंमलबजावणी व्हावी यासाठी संबंधित जिल्हाधिकारी व महानगरपालिका आयुक्त यांना निर्देश देण्यात यावेत, अशा सूचनाही मुख्यमंत्र्यांनी दिल्या आहेत. खासगी रुग्णालयात कोविडबाधित रुग्णांवर उपचारासाठी 80 टक्के खाटांसाठी शासनाने निश्चित केलेल्या दरानुसार व उर्वरित 20 टक्के खाटांसाठी खासगी रुग्णालयांनी निश्चित केलेल्या दरानुसार दर आकारणी करण्याबाबतची अधिसूचना काल संपली. आज त्यास मुदतवाढ देताना त्यात शहरांच्या वर्गीकरणानुसार सुधारणा करण्यात आली आहे.

दर कमी करण्यासाठी अनेक निवेदने

यासंदर्भात सार्वजनिक आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिलेल्या प्रस्तावात म्हटले आहे की, दर कमी करण्याबाबत अनेक निवेदने त्यांच्याकडे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे प्राप्त झाली होती. उपमुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत राज्य आरोग्य हमी सोसायटी यांच्याशी झालेल्या चर्चेच्या अनुषंगाने या दरांमध्ये गाव, शहरांचे वर्गीकरण करून बदल करण्याबाबत ठरले. तसा प्रस्ताव मुख्यमंत्र्यांच्या मान्यतेसाठी पाठविण्यात आला.

ग्रामीण भागातील रुग्णांवरील उपचाराचा खर्च कमी होणार 

यापुर्वीच्या अधिसूचनेत उपचारांचे दर हे मोठ्या शहरातील रुग्णालये व अति दुर्गम भागातील रुग्णालये यासाठी एकच होते. शहरांच्या वर्गीकरणामुळे आता उपचारांच्या खर्चात मोठा दिलासा मिळणार आहे. विमा कंपन्या आणि विविध प्रकारचे भत्ते देताना ज्याप्रमाणे शहरांचे वर्गीकरण केले जाते. त्याच निकषावर वर्गीकरण आणि संबंधित उपचारांचे दर निश्चित केल्यामुळे ग्रामीण भागातील रुग्णांवरील उपचाराचा खर्च तुलनेने कमी होणार आहे.

शहरांचे वेगवेगळ्या गटात वर्गीकरण

दरांसाठी शहरांच्या दर्जानुसार वर्गीकरण करण्यात आले आहे. अ, ब, क अशा गटात शहरे व भागांची विभागणी केली आहे. त्यामुळे आता शहरी व ग्रामीण भाग यामध्ये उपचारांचा दर वेगवेगळा असेल. पर्यायाने ग्रामीण भागात तुलनेने कमी खर्चात उपचार शक्य होतील.

रुग्णाला संबंधित रुग्णालयाने पुर्वलेखापरीक्षीत देयक देणे बंधनकारक करण्यात आले आहे. याशिवाय जास्त दर आकारणाऱ्या रुग्णालयांवर भरारी पथकांमार्फत पुन्हा तपासणी करण्याची आणि त्यावर कारवाई करण्याची तरतूदही या अधिसूचनेत कायम ठेवण्यात आली आहे. तशी माहिती राज्य आरोग्य हमी सोसायटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ सुधाकर शिंदे यांनी दिली

कोविड रुग्णांकडून जास्तीत जास्त किती दर आकारले जाऊ शकतात ?

वॉर्डमधील नियमित विलगीकरण ( प्रती दिवस)

– अ वर्ग शहरांसाठी 4  हजार रुपये, ब वर्ग शहरांसाठी 3 हजार रुपये आणि क वर्ग शहरांसाठी 2400 रुपये असे दर आकारता येतील. यामध्ये आवश्यक ती देखरेख, नर्सिंग, चाचण्या, औषधी, बेड्सचा खर्च व जेवण याचा समावेश आहे. कोविड चाचणीचा खर्च निश्चित केलेल्या दराप्रमाणे द्यावा लागेल. केवळ मोठ्या चाचण्या व तपासणी तसेच उच्च पातळीवरील मोठी औषधी यातून वगळली आहेत.

व्हेंटीलेटरसह आयसीयू व विलगीकरण :

– अ वर्ग शहरांसाठी 9000 रुपये, ब वर्ग शहरांसाठी 6700 रुपये आणि क वर्ग शहरांसाठी 5400 रुपये

केवळ आयसीयू व विलगीकरण:

– अ वर्ग शहरांसाठी 7500 रुपये, ब वर्ग शहरांसाठी 5500 रुपये आणि क वर्ग शहरांसाठी 4500 रुपये

अ वर्ग शहरांत मुंबई तसेच महानगर क्षेत्र ( भिवंडी, वसई-विरार वगळून), पुणे तसेच पुणे महानगर क्षेत्र, नागपूर ( नागपूर मनपा, दिगडोह, वाडी) या शहरांचा समावेश आहे.

ब वर्ग शहरांत नाशिक, औरंगाबाद, अमरावती, भिवंडी, सोलापूर, कोल्हापूर, वसई-विरार, मालेगाव, नांदेड, सांगली तसेच सर्व जिल्हा मुख्यालयांचा समावेश करण्यात आलाय.

क गटात अ आणि ब गटाव्यतिरिक्त इतर शहरे असतील

इतर बातम्या :

Maharashtra Coronavirus LIVE Update : नाशकात निर्बंध शिथिल होताच नाशिकच्या बाजार पेठांमध्ये तुफान गर्दी

विदेशात शिकायला जाणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी ‘वॉक इन लसीकरण’, पुणे महापालिकेच्या उपक्रमाला मोठा प्रतिसाद

(new rates for Corona treatment announced by Maharashtra government Uddhav Thackeray ordered to follow strictly)