मुंबई | 4 ऑक्टोबर 2023 : एसटीच्या ( MSRTC ) मुंबई सेंट्रल स्थानक ते बांदा या मार्गावर नवीन शयनयान बस सेवा उद्या 5 ऑक्टोबर 2023 पासून सुरु होणार आहे. मुंबई ते बांदा या मार्गावरील प्रवासासाठी 1246 रुपये तिकीट दर असणार आहेत. राज्य सरकारने लागू केलेल्या अमृत ज्येष्ठ नागरिक योजना, ज्येष्ठ नागरिक योजना आणि महिला प्रवाशांसाठी असलेल्या तिकीट सवलती या विना वातानुकूलीत शयनयान बसला देखील लागू होणार आहेत. पहिल्या टप्प्यात मुंबई सेंट्रल – बोरीवली – बांदा या मार्गावर ही शयनयान बसेस धावणार आहे. त्यानंतर गोव्यातील पणजीपर्यंत या बसेचा विस्तार करण्यात येणार आहे. एसटी महामंडळाच्या ताफ्यात नवीन पन्नास विना वातानुकूलित शयनयान बसेस ( sleeper coach ) येणार आहेत.
एसटीमध्ये फार काळापूर्वी शयनयान श्रेणी दर्जाच्या बसेस होत्या. आता एसटीच्या ताफ्यात 50 शयनयान बसेसची बांधणी टप्प्या टप्पाने होत आहे. या बसेस मध्ये 30 शयनकक्ष आहेत. त्यामुळे लांबच्या प्रवासात आरामात झोपून प्रवास करण्याची सोय होणार आहे. या बसेसची बांधणी एसटीच्या दापोडी येथील कार्यशाळेत करण्यात आली आहे. सुरुवातीला या बसेस मुंबई सेंट्रल ते कोकणातील बांदापर्यंत धावणार आहेत. त्यानंतर या बसेस गोवा येथील पणजीपर्यंत चालविण्याची योजना आहे.
बोरीवली – बांदा ( भविष्यात पणजी ) महाड, चिपळूण मार्गे या विना वातानुकूलित शयनयान बस सेवा उद्यापासून सुरु होत आहेत. बोरीवली ते बांदा या प्रवासासाठी 1169 रुपये ( महिला 585 रुपये ) असे तिकीट दर आहेत. तर मुंबई सेंट्रल ते बांदा प्रवासासाठी 1245 रुपये ( महिलांसाठी 625 रुपये ) तिकीट दर असणार आहेत. या बसेसना दोन्ही राज्यात वाहतूक करण्याचा परिवहन विभागाचा परवाना मिळाला की ही बस सेवा पणजीपर्यंत धावणार आहेत.
या विनावातानुकूलित बसेस सुरक्षितता आणि अत्याधुनिकतेचा संगम आहे. 30 शयनकक्ष असलेल्या या बसमध्ये प्रत्येक शयनकक्षात मोबाईल चार्जिंगची व्यवस्था, प्रत्येक कक्षाला स्वतंत्र खिडकी आणि पडदे, प्रवाशांना झोपण्यासाठी गादी सोबत उशी, रीडींग लॅम्प, सुरक्षिततेसाठी आपात्कालिन दरवाजा, आग प्रतिबंधक उपकरणे, आपात्कालिन स्थितीत काचा फोडण्यासाठी हातोडे, चालकांच्या केबिनमध्ये आपात्कालिन स्थितीत अनाऊन्समेंट करण्याची व्यवस्था, केवळ डाव्या बाजूला प्रवाशांचे सामान ठेवण्याची व्यवस्था आदी सुविधा आहेत.