वादग्रस्त सनदी अधिकारी पूजा खेडकर प्रकरणात मोठा ट्विस्ट आला आहे. पूजा खेडकर यांनी बनावट कागदपत्र देऊन आयएएस अधिकारी झाल्याचा आरोप होत असतानाच आता पूजा खेडकर यांच्याबाबतच अजून एक प्रकरण समोर आलं आहे. पूजा खेडकर या मानसिक आजारी असल्याचं उघड झालं आहे. तसं अभिलेख अहवालात म्हटलं आहे. पूजा यांच्याकडे याबाबतचं प्रमाणपत्र असल्याचंही सांगितलं जात आहे. त्यामुळे मानसिक आजारी व्यक्तीला एवढ्या मोठ्या पदावर घेतलं कसं? असा सवालही या निमित्ताने केला जात आहे. आता या नव्या प्रकरणामुळे पूजा खेडकर यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
वादग्रस्त आयएएस अधिकारी पूजा खेडकर यांना अहमदनगरच्या जिल्हा शासकीय रुग्णालयातून दिव्यांग प्रमाणपत्र देण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. अभिलेख तपासणीमध्ये ही बाब समोर आली असून जिल्हा शासकीय रुग्णालयातून 2018 मध्ये पूजा यांना नेत्र दिव्यांग प्रमाणपत्र आणि 2020 मध्ये मानसिक आजारी असल्याचे प्रमाणपत्र देण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.
पूजा यांना डोळे आणि मानसिक आजाराचे एकत्रित प्रमाणपत्र 2021 दिले होते. तत्कालीन वैद्यकीय मंडळांने हे प्रमाणपत्र दिले होते. शासकीय रुग्णालयाचे दस्तावेज तपासले असता त्यात या नोंदी आढळल्या असल्याचं जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर संजय घोगरे यांनी सांगितले आहे.
दरन्यान, पूजा खेडकरची आई मनोरमा यांच्यावर पुणे जिल्ह्यातील पौड पोलिसांकडून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मुळशीतील शेतकऱ्यांना हातात पिस्तूल घेऊन धमकविल्याबद्दल हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तब्बल वर्षभरानंतर गुन्हा दाखल झाल्याने पुणे ग्रामीण पोलिसांची कार्यप्रणाली संशयाच्या भोवर्यात अडकली आहे. 6 जून 2023 मध्ये पंढरी पासलकर यांनी मनोरमा यांनी आपल्याला पिस्तूल दाखवून धमकावल्याची तक्रार केली होती. प्रत्यक्षात पोलिस तपासात कोठेच पिस्तुलाचा उल्लेख करण्यात आला नव्हता. अखेर पुणे ग्रामीण पोलीस पोलिस अधिक्षक पंकज देशमुख यांनी शेतकऱ्यांनी बाजू ऐकून गुन्हा दाखल करून घेतला आहे.
दरम्यान, मुलगी आणि आईच नव्हे तर वडिलांवरही गंभीर आरोप आहेत. पूजा यांचे वडील माजी सनदी अधिकारी दिलीप खेडकर यांच्यावरही गंभीर आरोप झालेले आहेत. दिलीप खेडकर हे सनदी अधिकारी असून अहमदनगर येथील पाथर्डी तालुक्यातल भालगाव हे त्यांचे मूळ गाव आहे. त्यांच्या गावातील गावकरी त्यांच्या पाठीशी उभे राहिले आहेत. तसेच खेडकर कुटुंबावर होणारे आरोप खोटे असल्याचे गावकऱ्यांनी म्हटलंय. दिलीप खेडकर यांना काही झाल्यास आत्मदहन करण्याचा इशारा गावकऱ्यांनी दिलेला आहे.