शेगाव, विदर्भाची पंढरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या शेगावात (New Year in Shegaon) आजपासून भाविकांची गर्दी पाहायला मिळत आहे. सरत्या वर्षाला निरोप देण्यासाठी आणि नववर्षाच्या स्वागतासाठी शेगावात आजपासूनच गर्दी झाली आहे. मंदिर परिसरातील हॉटेल्स, भक्तनिवास हाऊस फुल्ल झालेले आहेत. राज्यासह गुजरात, मध्यप्रदेश, राजस्थान राज्यातूनही भाविक शेगावात दाखल झाले आहेत. कोरोना नंतर या वर्षी निर्बंध मुक्त वातावरणात नवीन वर्षाच स्वागत करण्यासाठी नागरिक उत्सुक आहेत.
नवीन वर्षाचा नवीन संकल्प करण्यासाठी भाविक शेगावात श्रींच्या दर्शनासाठी येत असतात. यंदा नववर्षाची सुरूवात गजानन महाराजांच्या दर्शनाने करण्यासाठी हजारो भाविकांचे संत नगरीत आगमन झालेले आहे. भक्तांची गर्दी लक्षात घेता मंदिर प्रशासनाने दर्शनाच्या वेळेत बदल केला आहे. संत गजानन महाराज मंदिर हे आज 31 डिसेंबर रोजी भक्तांना दर्शनासाठी रात्रभर उघडे राहील. आज 31 डिसेंबरला मंदिर दर्शनासाठी बंद करण्यात येणार नाही. दर्शन 1 जानेवारीला सलग सुरूच राहणार आहे. त्यामुळे भाविकांची गैरसोय होणार नाही, याची काळजी मंदिर प्रशासनाने घेतलीय.
नवीन वर्षाच्या निमित्ताने विठुरायाच्या दर्शनासाठी पंढरी नगरी आज गजबजून गेली आहे. आज सकाळपासूनच भाविकांनी दर्शनासाठी मंदिर परिसरात गर्दी केली आहे. नवीन वर्षाचं स्वागत आणि विठ्ठल रुक्मिणीच्या दर्शनासाठी दरवर्षी राज्यभरातून हजारो भाविक पंढरपूरमध्ये येतात.आजही नवीन वर्षाच्या निमित्ताने पंढरी नगरी फुलून गेली आहे. नविन वर्ष विकेंडला सुरू होत असल्याने अनेकजण सहपरिवार पंढरपूरमध्ये आलेले आहेत.
सरत्या वर्षाला निरोप आणि नव वर्षाच्या स्वागतासाठी भाविकांची अलोट गर्दी होत आहे. साईदर्शन झाल्यानंतर घरी साईबाबांचा लाडू प्रसाद न्यावा अशी प्रत्येक भाविकांची इच्छा असते. लाडू प्रसाद विक्री काउंटरवरही लाडू खरेदीसाठी लांबच लांब रांगा लागल्याच्या पहायला मिळत आहे.साईबाबा संस्थानाने गर्दीच्या पार्श्वभुमीवर 9 टन लाडू बनवले आहेत. साईमंदिर परिसर, भक्तनिवास अशा ठिकाणी देखील लाडू काउंटर उभारले असुन काउंटर संख्या देखील वाढवण्यात आली आहे तरीही प्रत्येक काउंटर लाडू खरेदीसाठी गर्दी दिसत आहे.