New Year Celebration 2025 : सरत्या वर्षाला निरोप देण्यासाठी महाराष्ट्र सज्ज झाला आहे. सध्या सर्वत्र आनंदाचे आणि उत्साहाचे वातावरण पाहायला मिळत आहे. महाराष्ट्रात ठिकठिकाणी विविध पार्ट्यांचे आयोजन करण्यात आले आहे. २०२४ हे वर्ष संपण्यासाठी अवघे काही तास शिल्लक राहिले आहेत. त्यामुळे सध्या मुंबई, पुणे, नागपूर यांसह बहुतांश ठिकाणी नवीन वर्षाच्या स्वागताची जय्यत तयारी करण्यात आली आहे. नवीन वर्षाचे जल्लोषात स्वागत करण्यासाठी संपूर्ण महाराष्ट्र सज्ज झाला आहे. विशेष म्हणजे आज रात्री मुंबई लोकलकडून विशेष लोकल सोडण्यात येणार आहेत. तर दुसरीकडे आज मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात येणार आहे.
सरत्या वर्षाला निरोप देण्यासाठी आणि 2025 या नवीन वर्षाचे स्वागत जल्लोषात करण्यासाठी हॉटेल्स, रेस्टॉरंट, पब, रिसॉर्टकडूनही तयारी करण्यात आली आहे. यानुसार विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जाणार आहे. तसेच विविध लज्जतदार पदार्थांची मेजवानीही असणार आहे. त्यासोबतच अनेकांच्या घरी हाऊस पार्टीचीही तयारी करण्यात येणार आहे. अनेकजण आपल्या मित्र-मैत्रिणी, कुटुंबियांसह नवीन वर्षाचे स्वागत करण्यासाठी सज्ज झाले आहेत. तर बहुतांश पर्यटन स्थळांवरील हॉटेलचे बुकींग हाऊसफुल्ल झाले आहे. आज रात्री ठिकठिकाणी वैविध्यपूर्ण कार्यक्रम आयोजित करण्यात येणार आहेत. विविध खाद्यपदार्थांचा आस्वाद घेत अन् लाईव्ह म्युझिक बँडच्या तालावर थिरकत न्यू इयर पार्टीचा जल्लोष ठिकठिकाणी केला जाणार आहे.
नववर्षाच्या स्वागतासाठी मुंबईकर सज्ज झाले आहेत. मुंबईतील गेटवे ऑफ इंडिया, मरीन ड्राईव्ह, गिरगाव चौपाटी, जुहू चौपाटी यांसह ठिकठिकाणी सरत्या वर्षाला निरोप देण्यासाठी आणि नववर्षाचे स्वागत करण्याचा विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत. मुंबईत ठिकठिकाणी पार्टीवर नियंत्रण ठेवण्यासाठी तसेच मुंबईकरांच्या संरक्षणासाठी १५ हजार पोलिसांचा फौजफाटा तैनात करण्यात आला आहे. मुंबई पोलीस थर्टीफर्स्ट निमित्ताने चालणाऱ्या पार्टींवर लक्ष ठेवणार आहेत. तसेच ‘ड्रंक अॅण्ड ड्राइव्ह’च्या विरोधात पोलिस विशेष मोहीम राबवणार आहेत.
मुंबई शहरातील हॉटेल्स, पब्ज, मॉल्स आणि चौपाट्यांवर होणारी गर्दी लक्षात घेऊन सशस्त्र दल, राज्य राखीव दल, बॉम्बशोधक आणि नाशक पथके, श्वान पथके, दंगल नियंत्रक पथके, शीघ्र कृती दल आणि फोर्सवन आदी विशेष पथकांवरही सुरक्षेची जबाबदारी आहे. गेट वे ऑफ इंडियासह गिरगाव, दादर, माहिम, जुहू, वर्सोवा, अक्सा, मढ, मार्वे, गोराई या चौपाट्या आणि पवई तलाव इत्यादी ठिकाणी पोलिस उपायुक्तांच्या निगराणीखाली विशेष बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. अमंली पदार्थविरोधी विभाग ड्रग्ज विक्रेत्यांच्या हालचालींवर करडी नजर ठेवणार आहेत. तसेच हॉटेल्स, पब्ज, नाइट क्लब, लाऊंज, फ्लॅट, बंगले, रिसॉर्टवरील पार्ट्यांवरही लक्ष ठेवण्यासाठी खबऱ्यांचे नेटवर्क सक्रिय केले आहे तर दुसरीकडे पोलिसांनी समुद्रातील गस्तीमध्ये वाढ केली आहे. मुंबईतील वाहतुकींमध्ये बदल करण्यात आला आहे. ताज हॉटेलच्या समोरील रस्ता संध्याकाळी वाहतुकीसाठी बंद राहणार आहे
कल्याणमध्ये आज पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त असणार आहे. या पार्श्वभूमीवर 2 सहाय्यक पोलीस आयुक्त, 83 अधिकारी, 532 अंमलदार तैनात असणार आहेत. त्यासोबत 17 ठिकाणी नाकाबंदी करण्यात आली आहे. तसेच 27 बीट मार्शल पेट्रोलिंग, 20 मोबाईल पेट्रोलिंग ही असणार आहे. तसेच प्रतिबंधक, छेडछाडविरोधी, बार चेकिंग, तपास आणि गोपनीय पथकं अशी विशेष पथके कार्यरत असणार आहेत. तसेच 8 ब्रेथ एनालायझर, 10 नाकाबंदी ठिकाणांवर कठोर कारवाई केली जाणार आहे.
पुण्यात सरत्या वर्षाला निरोपाच्या पार्टीवर नियंत्रण घालण्यासाठी 3000 पोलिस तैनात करण्यात आले आहेत. यामुळे दारू पिऊन गोंधळ घातल्यास कारवाई होणार आहे. नवीन वर्षाच्या पार्श्वभूमीवर ३१ डिसेंबर रोजी पुणे पोलिसांनी चांगलीच खबरदारी घेतली आहे. त्या अनुषंगाने सर्वच पोलिस ठाण्यांतर्गत तगडा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. यासोबतच पुणे शहरात ३ हजारांवर पोलिस अधिकारी आणि कर्मचारी बंदोबस्तासाठी तैनात असणार आहेत. त्यासोबत ८०० वाहतूक पोलिस कर्मचारी चौका-चौकांमध्ये तैनात असणार आहेत. पुणे शहरात प्रामुख्याने २७ महत्त्वांच्या ठिकाणांवर ड्रंक अँड ड्राइव्हची कारवाई केली जाणार आहे.
नाशिकमध्ये नवीन वर्षाच्या नाशिककर सज्ज झाले आहेत. या पार्श्वभूमीवर नाशिकचे पोलीस प्रशासन सज्ज झाले आहे. नाशिक शहरातील 65 स्पॉटवर ड्रिंक अँड ड्राईव्हची नाकाबंदी करण्यात आली आहे. तसेच थर्टी फर्स्टच्या पार्श्वभूमीवर तीन हजार पोलिसांचा फौजफाटाही तैनात करण्यात आला आहे. तसेच 200 पोलीस अधिकारी, 3000 पोलीस अंमलदार आणि सहाशे होमगार्डही रस्त्यावर असणार आहेत. यासोबतच गुंडाविरोधी पथक, अमली पदार्थ विरोधी, गुन्हे शोध पथक, बॉम्ब शोधक पथकही तैनात असणार आहेत. महिलांच्या सुरक्षेसाठी दामिनी, फिरस्ती पथक सीआर मोबाईल हे पोलिसांचे फिरस्ती पथकही सज्ज आहेत. अवघ्या चार मिनिटात ही पथक प्रतिसाद देणार आहेत.
नववर्षाच्या पार्श्वभूमीवर ठाण्याच्या खाडीलगत तसेच निर्जनस्थळी होणाऱ्या रेव्ह पार्टीवर पोलिसांचा यंदा ड्रोन वॉच असणार आहे. तसेच एखाद्या हॉटेल किंवा उच्चभ्रू वस्तीतील होणाऱ्या अमली पदार्थांच्या पार्टीवर पोलिस बारीक लक्ष ठेवणार आहेत. यासाठी ठाणे गुन्हे शाखेचे पथके तयार करण्यात आली आहेत. पोलीस आयुक्त ठाणे शहर आणि पोलिस उपायुक्त गुन्हे शाखा यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांची तुकडी सज्ज ठेवण्यात आली आहे.
सरत्या वर्षाला निरोप देण्यासाठी मोठ्या संख्येने पर्यटक कोकणात दाखल झाले आहेत. थर्टी फर्स्टच्या सेलिब्रेशनसाठी पर्यटकांचा उत्साह शिगेला पोहोचला आहे. अनेक जिल्ह्यातील समुद्रकिनारे पर्यटकांनी गजबजले आहेत. गणपतीपुळ्यातील समुद्रकिनारी पर्यटकांची तोबा गर्दी पाहायला मिळत आहे. या ठिकाणी अनेक पर्यटक समुद्रात डुंबण्याचा मनमुराद आनंद लुटत आहेत. राज्याच्या कानाकोपऱ्यातून पर्यटक कोकणात दाखल झाले आहेत.
नवीन वर्ष स्वागताच्या सेलिब्रेशनमध्ये खवय्यांसाठी सी फुड्सची मेजवानी पाहायला मिळणार आहे. खास नववर्षाच्या स्वागतासाठी कोकणात सी फुड्स खवय्यांसाठी हॉटेल्स सज्ज झाली आहेत. कोकणात आलेल्या पर्यटकांना सी फूड्सच्या विविध डिश चाखायला मिळणार आहेत. कोकणातील माशांपासून बनविण्यात आलेल्या डिशेसचे 25 विविध प्रकार नववर्षाच्या स्वागतासाठी सर्व्ह केले जाणार आहेत.
तोंडाला पाणी आणणाऱ्या माशांच्या पदार्थांच्या विविध 25 प्रकार असणार आहेत. सुरमई, बांगडा, मोडोवसा , खेकडा, पापलेट, टायगर प्रॉन्झ, व्हाईट प्रॉन्झ, भेल्डा(खापरी पापलेट), जंबो सुरमयी, लॉबस्टर, मांदेली, गेझर, सौंदाळे, तारली अशा वेगवेगळ्या माशांपासून हॉटेल्समध्ये वेगवेगळ्या डिश असणार आहेत. तसेच पापलेट फ्राय, फ़िश फ्राय, सुरमाय फ्राय, प्रोन्झ तंदूर, प्रॉन्झ करी, प्रॉन्झ फ्राय मसाला, प्रॉन्झ करी, प्रॉन्झ चिली, प्रॉन्झ मन्चुरियन, प्रॉन्झ शेजवान, पापलेट फ्राय, सुरमई फ्राय, सुरमई तवा मसाला, पापलेट करी, क्रॅब लॉलीपॉप, बांगडा फ्राय, सौंदाळा फ्राय यांचीही चव चाखायला मिळणार आहे.