नववर्षाच्या निमित्ताने राज्यातील तीर्थक्षेत्र भाविकांनी गजबजले, पहाटेपासूनच दर्शनासाठी रांगा

| Updated on: Jan 01, 2025 | 10:12 AM

नववर्षानिमित्त राज्यातील प्रमुख मंदिरांमध्ये आकर्षक सजावट करण्यात आली आहे. हे वर्ष सर्वांना सुख, समाधान, भरभराटीचे आणि निरोगी असावे, अशी प्रार्थना सर्व भाविकांकडून केली जात आहे.

नववर्षाच्या निमित्ताने राज्यातील तीर्थक्षेत्र भाविकांनी गजबजले, पहाटेपासूनच दर्शनासाठी रांगा
pandharpur temple
Follow us on

Happy New Year 2025 : आज नवीन वर्षाचा पहिला दिवस. सध्या सर्वत्र उत्साहाचे आणि आनंदाचे वातावरण पाहायला मिळत आहे. सरत्या वर्षाला निरोप देताना 2025 या नववर्षांच स्वागत मंगलमय स्वरुपात व्हावे, यानिमित्ताने राज्यातील सर्वच प्रमुख तीर्थक्षेत्र भाविकांनी गजबले आहेत. राज्यातील प्रमुख तीर्थक्षेत्रांपैकी एक असणाऱ्या पंढरपूर श्री विठ्ठल रुक्मिणी मंदीर, शिर्डी साईबाबा संस्थान, कोल्हापूरची अंबाबाई, तुळजापूरची तुळजाभवानी, श्री सिद्धीविनायक मंदीर, गणपतीपुळे मंदीर या ठिकाणी भाविकांची प्रचंड गर्दी पाहायला मिळत आहे. नववर्षानिमित्त राज्यातील प्रमुख मंदिरांमध्ये आकर्षक सजावट करण्यात आली आहे. हे वर्ष सर्वांना सुख, समाधान, भरभराटीचे आणि निरोगी असावे, अशी प्रार्थना सर्व भाविकांकडून केली जात आहे.

नववर्षाच्या निमित्ताने सध्या मुंबईतील सिद्धिविनायक मंदिरात भाविकांची गर्दी पाहायला मिळत आहे. पहाटेपासून हजारो भाविक दर्शनासाठी लांबच लांब रांगेत उभे असल्याचे दिसत आहेत. गणपती बाप्पाच्या दर्शनाने नवीन वर्षाची सुरुवात व्हावी, यासाठी भाविक मंदिरात जमले आहेत. नव्या वर्षात चांगल्या संकल्पांसाठी भाविकांनी मंदिरात हजेरी लावली आहे. नवीन वर्षाच्या निमित्ताने होणाऱ्या गर्दीचे व्यवस्थापन आणि भाविकांची सुरक्षा यासाठी विशेष उपाययोजना आखल्या जात आहेत. तर पहिली आरती अनुभवण्यासाठी उत्साह शिगेला पोहोचला आहे. काही भाविक पहिली लोकल पकडून, तर काही चालत मंदिरात पोहोचले.

पुण्यातील दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरात भाविकांची दर्शनासाठी गर्दी पाहायला मिळत आहे. नववर्षाची सुरुवात गणपती बाप्पाच्या दर्शनाने करण्यासाठी असंख्य भाविक रांगेत उभं राहून दर्शन घेत आहेत. पहाटेपासूनच आतापर्यंत हजारो भाविकांनी दर्शन घेतलं आहे. सध्या हा परिसर भाविकांच्या गर्दीने गजबजला आहे. नवीन वर्षाच्या पार्श्वभूमीवर दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरात सुंदर फुलांची आरास करण्यात आली आहे.

अंबाबाई मंदिरात भाविकांची गर्दी

तसेच कोल्हापुरात नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी अंबाबाई मंदिरात भाविकांची गर्दी पाहायला मिळत आहे. कोल्हापूरच्या अंबाबाई मंदिरात दर्शनाची रांग हाऊसफुल झाली आहे. तर मंदिराचा परिसरही भाविकांच्या गर्दीने गजबजला आहे. अंबाबाईच्या चरणी नवीन वर्षाचा नवीन संकल्प करण्यासाठी स्थानिकांसह देशभरातून भाविक अंबाबाई मंदिरात दाखल झाले आहेत.

शिर्डीत साईबाबांचे दर्शन घेण्यासाठी अलोट गर्दी

नवीन वर्षाची सुरुवात साई दर्शनाने करण्यासाठी आज पहाटेपासूनच भाविकांची शिर्डीत अलोट गर्दी झाली आहे. शिर्डीत भाविकांच्या गर्दीने दर्शनाच्या रांगा हाऊसफुल्ल झाल्या आहेत. सध्या या ठिकाणी साईनामाचा जयघोष करत भाविक साईचरणी नतमस्तक होताना दिसत आहेत. भाविकांच्या गर्दीच्या पार्श्वभूमीवर साई मंदिर रात्रभर खुले ठेवण्यात आले आहे. यामुळे आतापर्यंत लाखोंच्या संख्येने भाविकांनी साई दर्शनाचा लाभ घेतला आहे. नववर्षाच्या पार्श्वभूमीवर साई मंदिराला आकर्षक फुलांची सजावट करण्यात आली आहे.

अक्कलकोट नगरीत स्वामी भक्तांची मांदियाळी

सरत्या वर्षाला निरोप देत नवीन वर्षानिमित्त अक्कलकोटनगरीत स्वामी भक्तांची मांदियाळी पाहायला मिळत आहे. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून हजारो भाविक अक्कलकोटमध्ये दाखल झाले आहेत. अक्कलकोटमध्ये स्वामी समर्थांच्या मंदिरात दर्शनासाठी पहाटेपासूनच भक्तांनी गर्दी केली आहे. भाविकांच्या गर्दीने अक्कलकोट नगरी दुमदुमून गेली आहे. नवीन वर्षानिमित्त मंदिरात धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. महाराष्ट्रासह कर्नाटक, आंध्रप्रदेशासह राज्यातील विविध भागातील भाविक दर्शनासाठी अक्कलकोटमध्ये दाखल झाले आहेत. आम्ही वर्षाच्या सुरवातीला स्वामी समर्थांचे दर्शन घेऊन वर्षभरासाठी प्रेरणा घेऊन जातो. आम्हाला इथे येऊन एक वेगळीच ऊर्जा मिळते, अशा भावना लाखो भाविक व्यक्त करत आहेत.