नाशिकः नाशिक म्हणजे रत्नांची खाण. प्रभू रामचंद्र, छत्रपती शिवराय यांच्या पदस्पर्शाने पावन झालेली भूमी. स्वातंत्र्यवीर सावरकर, कुसुमाग्रज, बाबुराव बागुल ते वामनदादा कर्डकांची भूमी. या भूमीत नवर्षामध्ये फिरायला आलात, तर इतिहासासोबत बरेच काही तुम्ही तुमच्या सोबत घेऊन जाल. त्यासाठीच नववर्षात रम्य गाव कुसुमांचे बघाच, नाशिकला फिरायला याच…!
पश्चिम भारताची काशी
गोदावरीच्या डाव्या तीरावर वसलेला पंचवटी परिसर. काळाराम मंदिराजवळ वटवृक्षांचा समूह आहे. त्यामुळे या भागाला पंचवटी म्हटले जाते. काळाराम मंदिर, कपालेश्वर मंदिर, गंगा-गोदावरी मंदिर, सुंदर नारायण मंदिर, टाळकुटेश्वर मंदिर, नीळकंठेश्वर मंदिर, गोराराम मंदिर, मुरलीधर मंदिर, तिळभांडेश्वर मंदिर, बालाजी मंदिर, सांडव्याची देवी मंदिर, विठ्ठलमंदिर, पाताळेश्वर मंदिर, नारोशंकर मंदिर, रामकुंड, दुतोंडया मारुती, कार्तिकस्वामी मंदिर, काटयामारुती मंदिर, पंचमुखी हनुमान मंदिर, भद्रकाली मंदिर, कपुरथळा स्मारक अशी अनेक मंदिरे या भागात गोदावरीच्या दोन्ही तीरावर आहेत. त्यामुळेच नाशिकला पश्चिम भारताची काशी म्हणतात. देशभरातील अनेक पर्यटक आणि भाविक इथली धूळ मस्तकी लावण्यासाठी येतात.
सीतागुंफा
नाशिक शहरात मध्यवर्ती बस स्थानकापासून 3 किलोमीटर अंतरावर पंचवटीत सीतागुंफा आहे. वनवासादरम्यान सीता माता येथे रहात होत्या असे म्हटले जाते. पहिल्या मुख्य गुंफेत राम, सीता व लक्ष्मण यांच्या मूर्ती आहेत. दुस-या लहान गुंफेत शिवलिंग आहे. असे म्हणतात की, माता सीता भगवान शिवाची आराधना केल्याशिवाय जेवण करत नसत. त्यामुळे त्यांच्यासाठी येथे शिवलिंग स्थापन करण्यात आले. याच ठिकाणावरुन रावणाने भिकाऱ्याच्या वेषात सीताहरण केले. सीतागुंफेसमोर रामायणातील मारिच वध, सीताहरण असे देखावे लावण्यात आले आहेत.
काळाराम मंदिर
नाशिकमधील काळाराम मंदिर हे सरदार रंगराव ओढेकर यांनी सन 1782 मध्ये जुन्या लाकडी मंदिराच्या जागेवर बांधले. प्रभू रामचंद्र आपल्या वनवासादरम्यान ज्या जागी राहिले, त्या ठिकाणी हे मंदिर आहे, असे मानले जाते. या मंदिराच्या बांधकामासाठी 2000 कारागीर 12 वर्ष राबत होते. पश्चिम भारतातील प्रभू रामचंद्राच्या सुंदर मंदिरांपैकी एक असे हे मंदिर आहे. 245 फूट लांब व 145 फूट रुंद मंदिर परिसराला 17 फूट उंच दगडाची भिंत आहे. मंदिरासाठी सर्व बाजुंनी मोकळा असलेला स्वतंत्र सभामंडप आहे. मंदिरात प्रभू रामचंद्र, सीता, लक्ष्मण यांच्या काळया पाषाणातील 2 फूट उंचीच्या मूर्ती आहेत. चैत्र महिन्यात येथे रामनवमीचा उत्सव होतो.
पांडव लेणी
नाशिक म्हटले की पर्यटकांची पावले आपसुकच पांडव लेणीकडे वळतात. नाशिक नवीन बसस्थानकापासून 5 व महामार्ग बसस्थानकापासून 4 किलोमीटर अंतरावर या लेणी आहेत. त्यांचा काळ सुमारे 2500 वर्षांपूर्वीचा असल्याचे मानले जाते. लेणीमध्ये असलेल्या शिलालेखावरून त्या दोन हजारवर्षांपूर्वीच्या आहेत, हे सहज समजते. या ठिकाणी एकूण 24 लेणी आहेत. काही लेणी व त्यातील मूर्ती चांगल्या स्वरुपात तर काही खंडीत स्वरुपात शिल्लक आहेत. बुध्दस्तुप, भिक्षूंची निवासस्थाने, बुध्दबोधिसविता, जैन तीर्थकर ऋषभदेवजी, वीर मणिभद्रजी, माता अंबिकादेवी यांच्या मूर्ती, पाच पांडवसदृशमूर्ती, भीमाची गदा, कौरव मूर्ती, देवादिकांच्या मूर्ती, इंद्रसभा इथे पाहायला मिळते. शिवाय जिल्ह्यात अंजनेरी पर्वत ते इतर अनेक पर्यटन स्थळे आहेत.
त्र्यंबकेश्वरचे ज्योर्तिलिंग
नाशिकच्या जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वरचे ज्योर्तिलिंग मंदिर. भाविक आणि पर्यटकही या मंदिराला आवर्जुन भेट देतात. नाशिकपासून अवघ्या 28 किलोमीटर अंतरावर हे मंदिर आहे. गोदावरी नदीचे उगम स्थान असलेल्या ब्रम्हगिरी पर्वताच्या पायथ्याशी त्रयंबकेश्वर वसलेले आहे. सध्याचे मंदिर तिसरे पेशवे बाळाजी बाजीराव ( सन 1740 ते 1760 ) यांनी जुन्या मंदिराच्या जागेवर बांधले आहे. या मंदिराचे सारे व्यवस्थापन त्र्यंबकेश्वर मंदिर ट्रस्टकडून केले जाते. येथे येणाऱ्या भाविकांसाठी निवासाची सुविधा उपलब्ध आहे.
कुशावर्त तीर्थ
कुशावर्त तीर्थ त्र्यंबकेश्वर शहराच्या मध्यभागी श्री त्र्यंबकेवर मंदिरापासून 300 मीटरवर आहे. हे तीर्थ हे 21 फूट खोल आहे. येथे नैसर्गिक पाण्याचे झरे असलेले कुंड सन 1750 मध्ये बांधण्यात आले. गोदावरी नदी ब्रह्मगिरी पर्वतावरून लुप्त झाल्यांनतर ह्या ठिकाणी प्रकट होते, अशी काही लोकांची श्रध्दा आहे. या कुशावर्तात आधी स्नान करून मग त्र्यंबकेश्वर मंदिरात दर्शनार्थ जाण्याची परंपरा भाविक पाळतात. कुशावर्तात खाली जिवंत पाण्याचे झरे आहेत व गोदावरीच्या उगमस्थानापासून नंतरच्या नदीप्रवाह कुशावर्तात येऊन पुढे वळण घेतो. कुशावर्त परिसरातही काही छोटी मंदिरे आहेत. तीर्थात उतरण्यासाठी चारही बाजूने 15 दगडी पायर्या आहेत. गौतम ऋषींनी प्राचीन काळी येथेच गंगेला अडवले होते व तीर्थात पुण्यस्नान केले होते, अशी पौराणिक कथा आहे.
खंडोबा मंदिर
देवळाली छावणी परिसरातील एका लहान टेकडीवर खंडोबा मंदिर वसलेले आहे. भगवान शंकराचे अवतार मानले जाणारे श्री खंडोबा महाराजांचे हे मंदिर 500 वर्ष जुने आहे. पौराणिक कथेनुसार मल्ल दैत्य व मणी दैत्य या दोन राक्षस बंधुशी मंदिर संबधित आहे. या दोन्ही दैत्यांनी भगवान शिवाची आराधना करुन त्यांना भुतलावर कोणीही मारू शकणार नाही, असा वर प्राप्त करून घेतला. त्यानंतर संत, ऋषी व निरपराध लोकांना त्रास देण्यास सुरुवात केली. भगवान शिवाने श्री खंडोबाचा अवतार घेऊन या दोनही दैत्यांचा वध केल्यानंतर भगवान शिव या टेकडीवर विश्रामासाठी आले. त्यामुळे या मंदिरास विश्रामगड असे देखील म्हटले जाते. या टेकडीला खंडोबाची टेकडी असे देखील म्हणतात.
सात शिखरांची सप्तश्रृंगी
नाशिक आणि सप्तश्रृंगीचे नाते अतूट आहे. हा गड नाशिकपासून अवघ्या 60 किलोमीटवर. कळवण तालुक्यात वसला आहे. मंदिराची समुद्रसपाटीपासूनची उंची 4659 फूट. महाराष्ट्रातील साडेतीन शक्तीपीठांपैकी हे एक अर्धपीठ मानले जाते. देवीची 8 फूट उंचीची मूर्ती पाषाणात कोरली आहे. दोन्ही बाजुस 9 असे एकूण 18 हात व त्यात विविध आयुधे आहेत. सप्तश्रृंगी म्हणजे सात शिखरे. या गडाच्या पायथ्याशी नांदुरी गाव आहे. गडाच्या सात शिखरावर विविध औषधी वनस्पती आढळतात. गडावर कालीकुंड, सूर्यकुंड, दत्तात्राय कुंड अशी कुंड आहेत. पूर्वेला खोल दरीने विभागलेला मार्कंडेय डोंगर आहे. येथे मार्कंडेय ऋषींचे वास्तव होते, असे मानले जाते. त्यांनी या ठिकाणी दुर्गासप्तशतीची रचना केली. चैत्र व अश्विन नवरात्रात येथे देवी मोठी यात्रा भरते.
कावनई-कपिलधारा तीर्थ
नाशिक शहरपासून 50 किलोमीटर अंतरावर कावनई-कपिलधारा तीर्थ आहे. इगतपुरीपासून कावनाईचे अंतर 12 किलोमीटर आहे. श्री संत गजानन महाराज यांनी या परिसरात तपश्चर्या केली असे मानले जाते. हे ठिकाण कावनाई किल्ल्याच्या पायथ्याशी असून सभोवतालचा परिसर नयनरम्य आहे. कपिलधारा तीर्थ येथे विविध मंदिरे असून जवळच माता कामाक्षी मंदिर देखील आहे. या ठिकाणी वर्षभर वाहणारा नैसर्गिक पाण्याचा झरा देखील आहे.
अनेक दिग्गजांची भूमी
नाशिक हे कुसुमाग्रज अर्थातच वि. वा. शिरवाडकर यांचे जन्मस्थळ. स्वातंत्र्यवीर सावरकर भगूरचे. बाबुराव बागुल, वामनदादा कर्डक, दादासाहेब फाळके हे सारेच नाशिकचे. यांच्या निवास्थानाला भेट देण्याचा योगही नाशिकमध्ये आल्यास जुळून येतो. नाशिकमध्ये कुसुमाग्रज आणि दादासाहेब फाळके यांचे स्मारक आहे. या ठिकाणीही भेट देता येते.
देशातले पहिले फ्लॉवर पार्क
देशातले पहिले फ्लॉवर पार्क नाशिकमध्ये साकारले आहे. खरे तर नाशिकचे 1200 ते 1300 च्या दशकातील नाव म्हणजे गुलशनाबाद. कधीकाळी सुंदर आणि रंगीबेरंगी फुलांनी झाकलेले शहर म्हणून नाशिक प्रसिद्ध होते. मात्र, काळाच्या ओघात शहरीकरण वाढले आणि नाशिकची ही ओळख नाहीशी झाली. मात्र, फॉरेनच्या धर्तीवर उभारण्यात आलेल्या त्र्यंबकेश्वर येथील फ्लॉवर पार्कमुळे नाशिकला पुन्हा एकदा गुलशनाबादचे पुनर्वैभव मिळेल असे चित्र आहे. एकूणच काय, तर तुम्ही नाशिकमध्ये याल आणि इथला सुगंध आपल्यासोबत घेऊन जाल.
इतर बातम्याः
नाशिक महापालिकेची प्रभागरचना फुटल्याचा आरोप; नगरसेवकाच्या घरात बसून स्वकियांचाही करेक्ट कार्यक्रम