नाशिकः मुंबई महापालिकेची निवडणूक ऐन तोंडावर आली असताना महाविकास आघाडीतील घटक पक्ष असणारा काँग्रेस आक्रमक होताना दिसत आहे. मुंबईच्या खराब परिस्थितीला केवळ आणि केवळ शिवसेना (Shiv Sena) जबाबदार आहे, असा घणाघात शनिवारी काँग्रेस (Congress) नेते संजय निरुपम (Sanjay Nirupam) यांनी केला आहे. ते नाशिकमध्ये आले असता बोलत होते. यावेळी त्यांनी हाच मुद्दा आगामी महापालिकेत लावून धरणार असल्याचा निर्धारही व्यक्त केला आहे. जाणून घेऊयात काय म्हणाले संजय निरुपम ते…
हे शिवसेनेचे अपयश
ठाणे महापालिका निवडणुकीच्या तोंडावर शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये रंगलेला कलगीतुरा उभ्या महाराष्ट्राने पाहिले आहे. आता महाविकास आघाडीतील घटकपक्ष असणाऱ्या काँग्रेसचे नेते संजय निरुपम यांनीही शिवसेनेवर शरसंधान साधले आहे. निरुपम म्हणाले की, मुंबई महापालिकेत शिवसेना सपशेल अपयशी ठरले आहे. मुंबईच्या खराब परिस्थितीला केवळ आणि केवळ शिवसेना जबाबदार आहे. शिवसेनेचे मुंबई महापालिकेतील अपयश हाच काँग्रेसचा मुंबई महापालिकेतील निवडणुकीचा मुद्दा मुख्य मुद्दा असणार आहे, अशा शब्दांमध्ये निरुपम यांनी शिवसेनेवर आरोपाच्या फैरी झाडल्या आहेत. आता यावर शिवसेना काय प्रतिक्रिया देणार, याची उत्सुकता आहे.
निरुपमांचे विशेष प्रेम…
काँग्रेस नेते संजय निरुपम हे नेहमीच शिवसेनेला डिवचत राहतात. विशेषतः ते स्वतः पूर्वाश्रमीचे शिवसैनिक आहेत. त्यामुळे त्यांचे शिवसेनेवरचे हे विशेष प्रेम साऱ्यांनाच माहिती आहे. यापू्र्वीही त्यांनी परमबीर सिंह प्रकरणात एक ट्वीट करून खळबळ उडवून दिली होती. ते ट्वीटमध्ये म्हणाले होते की, हे मुंबई पोलिसांचे माजी पोलिस आयुक्त. मंत्र्यावर खंडणी वसुलीचा आरोप लावला होता. स्वत: पाच प्रकरणात वॉन्टेड आहेत. पोलिसांनी म्हटलं आहे की हे फरार आहेत. माहिती मिळाली आहे की ते बेल्जियमला आहेत. ते बेल्जियमला कसे गेले? यांना कुणी रस्ता मोकळा करुन दिला? आपण अंडरकव्हर अधिकारी पाठवून त्यांना परत आणू शकत नाहीत का? . आता त्यानंतर पुन्हा एकदा महापालिका निवडणुकीच्या तोंडावर निरुपम सक्रिय झाल्याचे दिसत आहेत. ते शिवसेनेची अडचण करणार हे नक्की.