महेश सावंत, सिंधुदुर्गः गूगलला (Google) धरणवीर असं सर्च केलं तर नाव अजित पवारच येणार, आम्ही सोडलेला बाण योग्य जागीच जाऊन लागलाय, अशी टीका भाजप नेते नितेश राणे यांनी केला आहे. विधानसभेचे विरोधी पक्ष नेते अजित पवार (Ajit Pawar) यांनी काल संभाजी महाराज (Sambhaji Maharaj) यांच्याबद्दल केलेल्या वक्तव्यावर स्पष्टीकरण देण्यासाठी पत्रकार परिषद घेतली. यात नितेश राणेंबद्दल विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर देताना त्यांनी टिल्लू असा शब्द वापरला. यावरून नितेश राणे यांनी पलटवार केला.
नितेश राणे म्हणाले, याच टिल्लूने सिंधुदुर्ग बँकेच्या निवडणुकीत तुम्हाला कसा घाम फोडला हे उभ्या महाराष्ट्राने पाहिलं आहे. काल अजित पवारांची चिडचिड बघितली. त्यामुळे आमची टीका योग्य ठिकाणी झाली आहे, असे नितेश राणे म्हणाले.
संभाजी महाराज हे धर्मवीर नसून स्वराज्य रक्षक होते, यावर आपण ठाम असल्याचं काल अजित पवार यांनी सांगितलं. यावरून नितेश राणे यांनी टीका केली. ते म्हणाले, ‘ छत्रपती धर्मवीर संभाजी राजेंना हिंदू धर्मापासून वेगळं करायचं आहे. कारण हे औरंगजेब बरोबर वेलेन्टाइन डे साजरा करणारे लोकं आहेत….
अजित पवारांचे सर्वेसर्वा रायगडमध्ये जाऊन नतमस्तक होताना दिसणार नाहीत. ज्यांनी वंशजांचे पुरावे मागितले त्यांना मांडीवर घेऊन फिरणारे हे राष्ट्रवादीवाले आहेत.
धरणवीर ही पदवी कोणाला दिली जावी असं विचारताच एकच नाव येणार …..एकच वादा अजित दादा! यांच्याच महाविकास आघाडी सरकारच्या काळात प्रतापगड,विशाळगडवर अनधिकृत बांधकाम झालं ते तोडण्याची हिंमत झाली नाही, अशा शब्दात नितेश राणे यांनी सुनावलं.
खालच्या पातळीवरची टीका मी पण करू शकतो. पण ते मला संस्कार नाहीत. शरद पवारांनी ही म्हटलय की धर्मवीर हे संभाजी महाराजच होते .आम्ही त्यांचे ऐकणार असंही नितेश राणे यांनी सुनावलं.
अजित पवार दर दोन दोन महिन्यांनी आत्मक्लेश करण्याची कारणे शोधतात. मग दोन तीन महिने गायब होतात.आत्मक्लेश करण्याचे गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड कोणाला जाईल तर अजित पवारांना…
आमच्यामध्ये त्यांनी उगीचच लावलावी करू नये. आम्हाला पण राष्ट्रवादीच्या अनेक लोकांचा फोन आला की अजित पवार चुकलेले आहेत.आत्मक्लेश करण्याची तारीख लवकरच जाहीर करावी, अशी खोचक टीका नितेश राणे यांनी केली.