कोल्हापूर : शिवसैनिक संतोष परब हल्ला प्रकरणात गेल्या अनेक दिवासांपासून भाजप आमदार नितेश राणे कोठडीत (Nitesh Rane Bail) आहेत. त्यांना आज दुपारी कोर्टाने जामीन मंजूर केला आहे. मात्र सध्या त्यांची तब्येत खालावल्याने ते कोल्हापूरच्या रुग्णालयात दाखल आहेत. नितेश राणे यांना जामीन मिळाला असला तरी त्यांना आजची रात्रही रुग्णालयात काढावी लागणार असं दिसतंय. कारण दुपारी त्यांच्या छातीत दुखत (Nitesh Rane Health) असल्याचे आणि रात्र उलट्या झाल्याचे सांगत डॉक्टरांनी अँजिओग्राफी (angiography) करण्याचं ठरवलं. सायंकाळी सहा वाजता त्यांच्यावर चार डॉक्टरांच्या उपस्थितीत अँजिओग्राफी टेस्ट होणार होती. मात्र आता ती रद्द झाल्याने त्यांना आजची रात्रही रुग्णलायात काढावी लागणार आहे. सुरूवातीला त्यांची प्रकृती कोठडीत बिघडल्यानंतर त्यांना सिंधुदुर्गमधील रुग्णालयात पाठवण्यात आलं. मात्र तिथेही त्यांच्या प्रकृतीत अजून सुधारणा झालेली नाहीये. त्यामुळे राणे कुटुंबीय आणि भाजप कार्यकर्त्यांची चिंता आणखी वाढली आहे.
आजची टेस्ट का रद्द झाली?
नितेश राणे यांना उच्च रक्तदाब आणि चक्कर येत असल्याने सिटी अँजिओग्राफी आज करण्यात येणार नाही, असे कारण कोल्हापुरातील डॉक्टरांनी सांगितलं आहे. त्यामुळे राणेंची चिंता वाढली आहे. वैद्यकीय पथकाने तपासणी केल्यानंतर सिटी अँजिओग्राफी आज न करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तसेच जामीन मंजूर मिळाल्याचे पत्र अद्याप सीपीआर रुग्णालयाला मिळालेले नाही अशीही माहिती प्रशासनाकडून देण्यात आली आहे. गेल्या काही दिवासांपासून नितेश राणेंची तब्येत अस्थिर आहे. त्यांच्यावर छातीत दुखत असल्याने कोल्हापुरात उपचार सुरू आहेत. मध्यरात्री उलट्याही झाल्या होत्या अशी माहिती समोर आली आहे. त्यामुळे आज संध्याकाळी 6 वाजता टेस्ट केली जाणार आहे, अशी माहिती देण्यात आली होती. त्यानंतर डॉक्टरांनी ही मोठी अपडेट दिली आहे.
नितेश राणेंच्या अडचणी संपेनात
नितेश राणे यांना संतोष परब यांच्यावरील हल्ल्या प्रकरणी अटक करण्यात आली होती. नितेश राणे यांना जामीन मंजूर करताना कोर्टाने काही अटीशर्ती घातल्या आहेत. नितेश राणे यांना चार्जशीट दाखल होईपर्यंत कणकवलीत येण्यास मनाई करण्यात आली आहे. तर तपासात कुठलाही हस्तक्षेप करू नये असे आदेशही कोर्टाने त्यांना दिले आहे. तसेच साक्षीदारांवर कोणताही दबाव आणू नये असेही कोर्टाने ठणकावले आहे. मात्र आता जामीन मिळून प्रकृती खालावल्याने चिंता वाढली आहे.