आमदार एकनाथ खडसे यांचा अजूनही भाजपमध्ये प्रवेश झालेला नाही. पण त्याआधीच त्यांनी एक मोठी घोषणा केली आहे. यापुढे मी कोणतीही निवडणूक लढवणार नाही असं नाही. पण माझा निवडणूक लढवण्यावर कल नाही. निवडणूक लढवण्याची माझी इच्छा नाही, असं एकनाथ खडसे यांनी स्पष्ट केलं आहे. त्यामुळे एकनाथ खडसे हे निवडणुकीच्या राजकारणापासून दूर राहणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे. एकनाथ खडसे भाजपमध्ये गेल्यावर राज्यपाल होणार असल्याची चर्चा होती. या पार्श्वभूमीवर खडसे यांच्या या विधानाला मोठं महत्त्व आलं आहे.
एकनाथ खडसे यांनी टीव्ही9 मराठीशी संवाद साधला. यावेळी त्यांनी ही प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. त्यांची कन्या रोहिणी खडसे यांच्या राजकीय भविष्याबद्दलही त्यांनी भाष्य केलं. माझ्या कन्येचं लग्न झालं आहे. पण ती रोहिणी खडसे असं नाव लावते. ते योग्यच आहे. तो तिला अधिकार आहे. पण सध्या ती दुसऱ्या पक्षात काम करत आहे. त्यामुळे तिच्या राजकीय भवितव्याचा निर्णय घेण्याचा तिचा तिला अधिकार आहे. पणमी मात्र भाजपसोबत असून माझ्या सुनेचा प्रचार करत आहे, असं एकनाथ खडसे यांनी म्हटलं आहे.
रावेर लोकसभेच नियोजन भाजपने आधीच केलं आहे. आता मी सुद्धा मतदारसंघ पिंजून काढला आहे. रक्षा ताईसाठी आता एकत्र काम करतोय. मला मतदारसंघ चांगला माहीत आहे. भाजपमध्ये असताना माझ्याच नेतृत्वात या मतदारसंघाच्या निवडणुका लढवल्या गेल्या. या मतदारसंघातील प्रत्येकाला मी नावानिशी ओळखतो. इथलं जातीय समीकरण मला माहीत आहे. गावागावातील लोकांशी ओळख आहे. त्याचा फायदा रक्षा खडसे यांना होईल, असं एकनाथ खडसे म्हणाले.
भाजपमध्ये आमचे वैर नव्हते. मतभेद होते. प्रत्येकाचे प्रत्येकाशी पटते असं नाही. जुन्या नव्याचा वाद असू शकतो. पण दुष्मनी अशी कुणासोबत नाही. माझी नाराजी संपलेली आहे. आता आम्ही जुळवून घेऊ. भाजपमध्ये परत येण्याचा मी स्वतः निर्णय घेतला. प्रवेश करण्यासाठी वरिष्ठांकडून अनुमती मिळाली आहे. विनोद तावडे आणि जेपी नड्डा यांनीही होकार दिला आहे. पण प्रवेश का थांबला हे माहीत नाही, असं त्यांनी सांगितलं.
शरद पवार यांनी मला चांगली मदत केली. आता तरी मी विधान परिषदेचा आमदार आहे. शरद पवार यांनी माझा राजीनामा घेणार नसल्याचं स्पष्ट केलं आहे. म्हणजे मी आमदार राहणार आहे. त्यामुळे दुसरी निवडणूक लढण्याचा प्रश्न येत नाही. पवारांनी माझ्या आमदारकीचा राजीनामा मागितला नाही. त्यामुळे इतरांना माझा राजीनामा मागण्याचा अधिकार नाही, असंही ते म्हणाले.