मुंबई: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (cm uddhav thackeray) यांनी आमदारांसाठी मुंबईत 300 घरे बांधणार असल्याची घोषणा काल विधानसभेत केली. त्यावरून संमिश्र प्रतिक्रिया उमटत आहेत. काही आमदारांनी या घोषणेचं स्वागत केलं आहे. तर काही आमदारांनी मात्र या घरांना विरोध केला आहे. आमदारांना (mla) घरे हवीतच कशाला? त्यापेक्षा शेतकऱ्यांना वीज मोफत द्या, असा सूर काही आमदारांनी लावलेला आहे. आमदारांमध्येच घरे घेण्यावरून दुमत असल्याने अखेर राज्य सरकारने घरांबाबतची भूमिका स्पष्ट केली आहे. आमदारांना देण्यात येणारी घरे मोफत देण्यात येणार नसल्याचं राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी स्पष्ट केलं आहे. आमदारांकडून घराची किंमत वसूल केली जाईल, त्यानंतरच त्यांना घरांचा ताबा मिळणार असल्याचं जितेंद्र आव्हाड (jitendra awhad) यांनी म्हटलं आहे. आव्हाड यांनी ट्विट करून ही माहिती दिली आहे. त्यामुळे आमदारांच्या घरांवरून निर्माण झालेला संभ्रमाचा धुरळा खाली बसण्याची चिन्हे दिसत आहेत.
आमदारांना देण्यात येणाऱ्या घरांवरून बराच गदारोळ होतोय. मी स्पष्ट करू इच्छितो की, सदर घरे मोफत देण्यात येणार नसून त्या जागेची किंमत, बांधकाम खर्च (अपेक्षित खर्च 70 लाख) याची किंमत संबंधित आमदारांकडून आकारण्यात येणार आहे, असं ट्विट जितेंद्र आव्हाड यांनी केलं आहे. त्यामुळे आमदारांना फुकटात घरे मिळणार नसल्याचं स्पष्ट झालं आहे.
महाविकास आघाडीचं सरकार फक्त बोलणारं नाही तर करून दाखवणारं सरकार आहे, असे म्हणत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आमदारांना मुंबईत 300 घरे देणार असल्याचं जाहीर केलं. आमदारांना मुंबईत कायमस्वरुपी घरे देण्याची मागणी शिवसेनेच्या आमदारांकडून करण्यात आली होती. त्यावर मुख्यमंत्र्यांनी ही घोषणा केली.
भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी मीडियाशी संवाद साधताना सरकारच्या या निर्णयावर प्रतिक्रिया व्यक्त केली. मी आणि सदाभाऊ खोत सोडलं तर अनेकांकडे दोन दोन तीन तीन घरे आहेत. त्यामुळे आमदारांना घरे देण्याची गरज नाही. कुणी आमदार होण्यासाठी नारळ दिला नव्हता. या लोकांना रोज डिप्लोमसी करावी लागत आहे. कशाला हवं घर? असा सवाल पाटील यांनी केला.
आमदारांना देण्यात येणाऱ्या घरांवरून बराच गदारोळ होतोय.मी स्पष्ट करू इच्छितो की,सदर घरे मोफत देण्यात येणार नसून त्या जागेची किंमत+बांधकाम खर्च(अपेक्षित खर्च 70 लाख) याची किंमत संबंधित आमदारांकडून आकारण्यात येणार आहे.
— Dr.Jitendra Awhad (@Awhadspeaks) March 25, 2022
संबंधित बातम्या:
मेव्हणा पकडला अन् मुख्यमंत्री बाहेर आले, Nilesh Rane यांची Uddhav Thackeray यांच्यावर खोचक टीका