मुंबई: राष्ट्रवादीचे नेते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक (nawab malik) यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी भाजपने (BJP) मोर्चाचं आयोजन केलं आहे. मलिकांच्या राजीनाम्यासाठी भाजपने दबाव वाढवण्यास सुरुवात केली आहे. मात्र, राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pawar) यांनी मलिक यांच्या राजीनाम्याची मागणी धुडकावून लावली आहे. नवाब मलिकांच्या राजीनाम्याचा प्रश्नच येत नाही, असं शरद पवार यांनी म्हटलं आहे. उलट मलिक गेल्या 25-30 वर्षापासून सभागृहात आहेत. एवढ्या वर्षात कधी मलिकांवर असे आरोप झाले नाहीत. आताच का आरोप होत आहेत? असा सवाल शरद पवार यांनी केला आहे. तर दुसरीकडे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी सभागृहात नवाब मलिक यांच्या राजीनाम्याची मागणी केली. मलिक यांचा तात्काळ राजीनामा घ्यावा. सरकारने त्याबाबतची घोषणा करावी, अशी मागणीच फडणवीस यांनी केली आहे. भाजपचा मोर्चा, फडणवीसांची मागणी आणि शरद पवार यांनी नवाब मलिक यांना दिलेलं समर्थन यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे काय निर्णय घेतात याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.
राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी आज मीडियाशी संवाद साधला. नवाब मलिकांचा कशासाठी राजीनामा घ्यायचा? जो माणूस 25-30 वर्ष विधीमंडळात आहे. या वर्षात कधी त्यांच्यावर आरोप केला नाही. आता करत आहेत. एखादा मुस्लिम कार्यकर्ता असला तर तो दाऊदशी संबंधित ठरवला जातो हे चुकीचं आहे. आम्ही मलिकांच्या पाठिशी आहोत, असं शरद पवार म्हणाले.
दरम्यान, मलिकांच्या राजीनाम्यासाठी भाजप आक्रमक झाली आहे. भाजपचे असंख्य कार्यकर्ते आझाद मैदानात जमले आहेत. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, चंद्रशेखर बावनकुळे, सुधीर मुनगंटीवार आणि गिरीश महाजन आदी नेते आझाद मैदानातील मोर्चात सामिल होण्यासाठी निघाले आहेत. आझाद मैदानात जमलेल्या कार्यकर्त्यांनी देश के गद्दारों को, जुते मारो सालों का अशा घोषणा देण्यास सुरुवात केली आहे. जोपर्यंत मलिक यांचा राजीनामा घेतला जात नाही तोपर्यंत आम्ही मागे हटणार नाही, असं भाजप कार्यकर्ते म्हणत आहेत.
दुसरीकडे विधानसभेचं कामकाज सुरू होताच देवेंद्र फडणवीस यांनी मलिक यांच्या राजीनाम्याची मागणी लावून धरली. मलिक यांचा तात्काळ राजीनामा घ्या, त्याची आजच घोषणा करा, अशी मागणी फडणवीस केली. फडणवीस यांनी ही मागणी करताच सभागृहात सत्ताधाऱ्यांनी त्याला आक्षेप घेत गोंधळ घातला. सत्ताधारी आणि विरोधी पक्षांचे सदस्य आमनेसामने आल्याने सभागृहातील गोंधळ वाढला. त्यामुळे कामकाज करणं अशक्य झाल्याने सभागृहाचे कामकाज अर्ध्या तासासाठी तहकूब करण्यात आलं.
संबंधित बातम्या:
आघाडीला अस्थिर करण्याचे प्रयत्न सुरू, पण सरकारला कुणीही धक्का लावू शकणार नाही; शरद पवारांनी ठणकावले
VIDEO: फडणवीसांच्या स्टिंग बॉम्बमधले मोठे साहेब कोण? शरद पवारांनीच खुलं खुलं सांगितलं, वाचा सविस्तर