कल्याण: आता कल्याणहून भिवंडीचा प्रवास सुस्साट होणार आहे. कल्याणच्या दुर्गाडी खाडीवरील पुलाचे काम पूर्ण झालं आहे. त्यामुळे खाडी पुलावरील दोन लेनचं येत्या 31 मे रोजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते ऑनलाईन लोकार्पण करण्यात येणार आहे.
गेल्या काही वर्षापासून नव्या पूलाचे काम सुरू होते. या सहा पदरी पुलाच्या कामापैकी दोन लेन सुरू होणार आहेत. अतिवृष्टीचा फटका आणि त्यानंतर लॉकडाऊनमुळे पुलाच्या कामात अडचणी आल्या होत्या. मात्र, पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पुढाराने या पुलाचे काम वेगाने सुरू झाले. त्यामुळे दोन लेनचे काम पूर्ण झाल्याने या सहापैकी दोन लेन सुरू होणार आहेत. त्यामुळे या मार्गावरील वाहतूक कोंडीचा प्रश्न सुटणार आहे. एमएमआरडीए क्षेत्रातील भिवंडी-कल्याण शीळ हा रस्ता महत्वाचा रस्ता आहे. हा रस्ता 21 किलोमीटर इतका आहे. या रस्त्यावर अस्तित्वात असलेला दोन लेनचा जुना पूल आत्ता लोकसंख्येच्या मानाने आणि वाढत्या रहदारीमुळे कमी पडत होता. त्याठिकाणी वाहतूक कोंडी होत होती. त्यामुळे या पुलाला समांतर सहा पदरी पूलाचे काम एमएमएमआरडीएच्या माध्यमातून 2016 साली हाती घेण्यात आले होते, असं कल्याणचे आमदार विश्वनाथ भोईर यांनी सांगितलं.
कामाची संथगती, कंत्राटच रद्द
या पुलाच्या कामामध्ये सुरुवातीला अनेक अडथळे आले होते. सुरुवातीला नेमलेला कंत्राटदार कामात दिरंगाई करीत होता. तसेच खाडीवर हा पूल उभारायचा असल्याने त्याठिकाणी स्पॅनचा आराखडा नव्याने द्यावा लागला. नेमलेला कंत्राटदार संथगतीने काम करीत असल्याने त्याचे कंत्राट रद्द करण्यात आले होते. त्यानंतर टी अॅण्ड टी कंपनीला काम देण्यात आले. या कंपनीने कामात गती घेतली होती. मात्र 2019 मध्ये पुलाच्या कामाला अतिवृष्टीचा तडाखा बसला. त्यानंतर कोरोनाचा फटका बसला. त्यामुळे कामाला विलंब होत होता. आता दोन लेन तयार झाल्या आहे, असं एमएमआरडीएचे अधीक्षक अभियंता जयवंत ढाणे यांनी सांगितलं.
चार लेनचं काम प्रगतीपथावर
पुलाच्या दोन्ही लेनचे लोर्कापण झाल्यावर आधी अस्तित्वात असलेला दोन लेनचा पूल आणि नव्या पूलाच्या दोन लेन खुल्या झाल्याने चार लेन उपलब्ध होणार आहेत. उर्वरीत चार लेनचे कामही प्रगती पथावर असल्याचे अधिकारी वर्गाकडून सांगण्यात आले. आज शिवसेनेचे आमदार विश्वनाथ भोईर आणि एमएमआरडीएचे अधीक्षक अभियंता जयवंत ढाके यांनी नव्या पुलाची पाहणी केली. यावेळी भोईर यांनी हा पूल 31 मे पासून नागरिकांसाठी खुला होणार असल्याची माहिती दिली. या पुलाचा लोकार्पण कार्यक्रम 31 मे रोजी संध्याकाळी 5 वाजता होणार आहे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे ऑनलाईन उद्घाटन करणार आहेत. यावेळी जिल्ह्याचे पालकमंत्री, खासदार आणि स्थानिक आमदार उपस्थित राहणार आहेत, असं सांगण्यात आलं.
संबंधित बातम्या
बघू कोण किती प्रामाणिक आहे ते?; मराठा आरक्षणावरून अशोक चव्हाणांचा भाजपला इशारा