राज्यातला कोरोना रुग्णांचा आकडा 10 हजाराच्या जवळ पोहोचला आहे, आज दिवभरात 9 हजार 170 रुग्ण नवे कोरोना रुग्ण आढळून आले आहेत, तर एकट्य़ा मुंबईतल्या कोरोना रुग्णांचा आकडा 6 हजारांच्या पुढे गेला आहे, राज्यात आज 7 कोरोना रुग्णांचा मृत्युही झाला आहे. राज्यात दिवसेंदिवस कोरोना रुग्ण वाढत चालल्याने पुन्हा प्रशासनाची डोकेदुखी वाढली आहे. प्रशासनाकडून निर्बंध आणखी कडक करण्यात येण्याची शक्यता आहे. मुंबईतला कोरोना रुग्णांचा आकडा सर्वात जास्त असल्याने मुंबईत नियम आणखी कठोर केले जाण्याबाबत विचार सुरू आहे.
राज्यातील रुग्णांपैकी एकट्या मुंबईत निम्म्यापेक्षा जास्त रुग्ण
आजची राज्यातली कोरोना रुग्णांची आकडेवारी 9 हजारांच्या पुढे पोहोचली असतली तरी त्यात मुंबईतील कोरना रुग्णांची आकडेवारी निम्म्यापेक्षा जास्त म्हणजेच 6 हजारांच्या पुढे आहे. मुंबई वगळता राज्यातली आकडेवारी ही 3 हजारांपेक्षा कमी आहे. त्यामुळे मुंबई महानगरपालिकेची जास्त चिंता वाढली आहे. ओमिक्रॉनच्या संसर्गाचा वेग वाढतोय. रुग्णसंख्या वाढतेय, त्यामुळे नियम कठोरपणे पाळले गेले पाहिजेत. संख्या वाढू नये, संसर्ग वाढू नये, यासाठीचे उपाय करणं हे पहिलं प्राधान्य आहे, असं राजेश टोपे यांनी म्हटलंय. मुंबई-पुण्यात संख्या वाढतेय, त्यामुळे या शहरांमध्ये अधिक कडक निर्बंध जारी होणार का, असा प्रश्ना टोपे यांनी उपस्थित करण्यात आला होता. त्यावर उत्तर 10-11च्या दरम्यान आहे. मुंबई, ठाणे, पुणे या भागात जास्त पॉझिटिव्हिटी रेट आहे. पॉझिटिव्हिटी रेट, बेड्सची उपलब्धता आणि ऑक्सिजनची उपलब्धता पाहून सरकार योग्य तो निर्णय घेईल असं राजेश टोपे यांनी म्हटलंय.
लॉकडाऊनबाबत टोपे काय म्हणाले?
लॉकडाऊनचा परिणाम अर्थकारणावर होतो. लॉकडाऊनची झळ प्रत्येकाला बसली आहे. जान है तो जहान है. त्यामुळे लोकांची काळजी घेणं, यालाच आमचं पहिलं प्राधान्य असणार आहे. कठोर निर्णय घ्यावे लागले, तर घेऊच. पण एक नक्की आहे, निर्बंध पहिलं पाऊल असतं. लोकांनी ते पाळले, तर परिस्थिती नियंत्रणात येईल, असा विश्वास टोपे यांनी बोलताना व्यक्त केलाय.आज एक टप्पा आपण ठरवून दिलेला आहे. मर्यादा घातलेल्या आहेत. गर्दीवर नियंत्रण आणण्यासाठी निर्बंध लादण्यात आलेले आहे. त्याचा परिणाम एक दोन दिवसात दिसेल. यावरुन नियंत्रणात आलं, तर ठीक, नाहीतर अधिक कठोर निर्णय घ्यावे लागतील, असंदेखील पत्रकारांशी बोलताना राजेश टोपे यांनी म्हटलं आहे.