“आम्ही छगन भुजबळांच्या पाठिशी, गरज पडली तर…”, ओबीसी नेत्यांचा एल्गार, रणनिती ठरली

| Updated on: Dec 22, 2024 | 1:47 PM

ओबीसी नेते प्रकाश शेंडगे यांच्या अध्यक्षेतखाली ही बैठक आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीला राज्यभरातील ओबीसी नेते उपस्थितीत आहेत. या बैठकीत ओबीसींचे प्रश्न आणि छगन भुजबळ यांना मंत्रिमंडळातून डावलल्याबद्दल चर्चा केली जाणार आहे. या बैठकीत पुढची रणनीती काय असणार हे ठरणार आहे.

आम्ही छगन भुजबळांच्या पाठिशी, गरज पडली तर..., ओबीसी नेत्यांचा एल्गार, रणनिती ठरली
छगन भुजबळ, नेते, राष्ट्रवादी
Image Credit source: Facebook
Follow us on

राज्य मंत्रिमंडळाच्या विस्तारात राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांना वगळण्यात आले. यामुळे त्यांनी जाहीरपणे नाराजी व्यक्त केली. “जहाँ नहीं चैना वहा नहीं रहना”, असं सूचक वक्तव्य छगन भुजबळ यांनी केले होते. यानंतर छगन भुजबळांच्या नाराजीचे पडसाद राज्यभरात उमटले. त्यानंतर आता छगन भुजबळांनी राज्यभरातील समर्थकांचा मेळावा घेण्याची घोषणा केली होती. तसेच यावेळी ओबीसी एल्गार पुकारु, असा निर्धारही त्यांनी व्यक्त केला होता. याच पार्श्वभूमीवर आता ओबीसी समाजाच्या प्रमुख नेत्यांची बैठक पार पडत आहे.

मुंबईत ओबीसी समाजाच्या प्रमुख नेत्यांच्या बैठकीला सुरुवात झाली आहे. महिला आर्थिक विकास मंडळाच्या सभागृहात ही बैठक पार पडताना दिसत आहे. ओबीसी नेते प्रकाश शेंडगे यांच्या अध्यक्षेतखाली ही बैठक आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीला राज्यभरातील ओबीसी नेते उपस्थितीत आहेत. या बैठकीत ओबीसींचे प्रश्न आणि छगन भुजबळ यांना मंत्रिमंडळातून डावलल्याबद्दल चर्चा केली जाणार आहे. या बैठकीत पुढची रणनीती काय असणार हे ठरणार आहे.

आज ओबीसीच्या सर्व प्रश्नांवर चर्चा

या बैठकीपूर्वी ओबीसी नेते प्रकाश शेंडगे यांनी प्रसारमाध्यमांशी चर्चा केली. त्यावर त्यांनी बैठकीत काय काय मुद्द्यांवर चर्चा केली जाईल, याबद्दलची सविस्तर माहिती दिली. आम्ही आज ओबीसीच्या सर्व प्रश्नांवर चर्चा करणार आहोत. नव्या सरकारकडून आम्हाला अपेक्षा आहेत. आमच्या मागण्यांचा मसुदा आम्ही तयार करणार आहोत. तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, एकनाथ शिंदे यांची भेट घेऊन याबद्दलचा निर्णय घेऊ, असे प्रकाश शेंडगे यांनी सांगितले.

“छगन भुजबळांकर अन्याय झाला”

“महायुती सरकारमध्ये १७ ओबीसी नेते मंत्री झाले आहेत. पण चळवळीचा माणूस छगन भुजबळ हे मंत्रिमंडळात नाहीत. मंत्रिमंडळात असलेले ओबीसी नेते म्हणजे सारा गाव मामाचा पण एक नाही कामाचा अशी अवस्था आहे. छगन भुजबळांकर अन्याय झाला पण आम्ही ओबीसी समाज म्हणून त्यांना एकटे पाडू देणार नाही. आम्ही कुठल्याही परिस्थिती त्यांच्या मागे उभे आहोत. छगन भुजबळ सत्तेत असतील किंवा नसतील आम्ही त्यांच्यासोबत आहोत”, असेही प्रकाश शेंडगे म्हणाले.

“…तर रस्त्यावर उतरू”

“नव्या मंत्रिमंडळाच्या खातेवाटपानंतर पहिल्या बैठकीत जातीय जनगणना करण्याचा ठराव मंजूर व्हावा, अशी आमची अपेक्षा आहे. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाल्याने जरांगे पाटील आता अधिक तीव्रतेने आंदोलन करण्याची शक्यता आहे. अशातच सरकारने दबावाने ओबीसींवर अन्याय होऊ देऊ नये अशी अपेक्षा आहे. ओबीसी प्रश्न आणि छगन भुजबळांसाठी गरज पडली तर रस्त्यावर उतरून लढाई लढण्याची आमची तयारी आहे”, असेही प्रकाश शेंडगेंनी म्हटले.

ओबीसी नेत्यांच्या या बैठकीनंतर लगेचच छगन भुजबळ हे एक बैठक घेणार आहेत. या बैठकीनंतर ते महत्त्वाचा निर्णय घेण्याची शक्यता वर्तवली जात आहे. ओबीसी नेते छगन भुजबळ यांनी वेगळी भूमिका घेतल्यास महायुतीला स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत मोठा फटका सहन करावा लागू शकतो. त्यामुळे भुजबळांची नाराजी दूर करण्यासाठी आता महायुतीचे नेते सरसावले आहेत.