चैतन्य गायकवाड, नाशिक : स्मार्ट सिटी कंपनीने विकासकामे करण्याच्या नावाखाली नाशिकच्या पंचवटीतील गोदावरी किनारी असलेल्या नीलकंठेश्वर मंदिरालगतच्या पुरातन पायऱ्या फोडल्यानंतर काही दिवसांपूर्वी नाशिककर आक्रमक होऊन त्यांनी स्मार्ट सिटी कंपनीच्या विरोधात जोरदार आंदोलन केले होते. मंगळवारी स्मार्ट सिटी कंपनीच्या अधिकाऱ्यांसोबत या नागरिकांची बैठक झाली होती. या बैठकीनंतर आज स्मार्ट सिटी कंपनीच्या अधिकाऱ्यांना जाग आली असून, त्यांनी गोदावरी किनाऱ्यावरील भोंगळ कामांची पाहणी केली आहे. मंदिरालगतच्या दुरावस्था झालेल्या पुरातन पायऱ्यांची देखील पाहणी केली. स्मार्ट सिटी कंपनीकडून गोदावरी किनाऱ्यावर सुरू असलेली विकासकामे अनेकदा वादात सापडले आहे. यावर वेळोवेळी नागरिकांनी आक्रमक भूमिका देखील घेतली होती. त्यामुळे आज स्मार्ट सिटी कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुमंत मोरे आणि इतर अधिकाऱ्यांनी नागरिकांसमवेत पाहणी केली आहे.
गोदाकाठावरील दुरावस्था झालेल्या पायऱ्या, तसेच इतर कामे देखील येत्या दोन महिन्यांत पूर्ण करण्यात येईल असे आश्वासन अधिकाऱ्यांनी दिले आहे.
स्मार्ट सिटीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी या कामांवर स्वतः जातीने लक्ष घालण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.
आगामी काळात स्मार्ट सिटीच्या माध्यमातून होणाऱ्या कामांमधून नागरिकांच्या भावना दुखावण्याचे काम करू नये, अन्यथा नागरिकांच्या रोशाला सामोरे जावे लागेल असा इशारा देखील नागरिकांनी दिला.
सुरुवातीपासूनच नाशिकच्या रामकुंड परिसरात स्मार्ट सिटीच्या माध्यमातून केले जाणाऱ्या कामावर नाशिककरांनी नाराजी व्यक्त केली आहे.
गोदाकाठावरील स्मार्टसिटीच्या वतिने केलं जाणारं काम बघता, धार्मिक भावना दुखावणारे तर कधी पुरातत्व विभागाच्या नियमांचे उल्लंघन करणारे असल्याचा आरोप नागरिक करीत आहे.