गडचिरोलीः विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) सध्या विदर्भ दौऱ्यावर आहेत. मागील दोन महिन्यांपासून विदर्भातील विविध जिल्ह्यांमध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचं (Vidarbha Farmers) मोठं नुकसान झालं आहे. शेकडो एकर शेती पाण्याखाली गेली आहे. त्यामुळे कर्ज घेतल्यानंतरही शेतकऱ्यांच्या हाती पिक येणार नाही. या परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी दौरे सुरु केले आहेत. आज गडचिरोलीतील (Gadchiroli) ग्रामीण भागात त्यांनी प्रत्यक्ष दौरा केला. शेतकऱ्यांची विचारपूस केली. त्यांच्या नेमक्या काय अडचणी आहेत, ते समजून घेतले. पेरणी करण्याच्या वेळेतच अतिवृष्टी झाल्याने यंदा पिक घेताच येणार नाहीत, अशी स्थिती असल्याचं शेतकऱ्यांनी सांगितलं. धान शेतीसाठीचे मुख्य दोन महिनेच अतिवृष्टी झाल्याने नंतर पिक घेऊनही फार उपयोग होणार नाही. त्यामुळे सरकारने लवकरात लवकर येथील जमिनींचे पंचनामे करून मदत जाहीर करावी, अशी मागणी शेतकऱ्यांनी अजित पवार यांच्याकडे केली. अजित पवार यांनीदेखील विदर्भातील आणखी काही जिल्हे आणि त्यानंतर मराठवाड्यातील जिल्ह्यांना भेट दिल्यानंतर येत्या अधिवेशनात यासंबंधीचा अहवाल सादर करून सरकारकडे शेतकऱ्यांना मदत देण्याची मागणी करणार असल्याचं सांगितलं.
गडचिरोलीतील शेतकऱ्यांशी अजित पवारांशी संवाद साधला. त्यानंतर त्यांनी माध्यमांना प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले, ‘ बाबा अत्राम, रोहित कालच भेटून गेले. मला ते सगळं सांगत होता. पंधरा वीस शेतकरी आहेत. काय होतं की आम्ही जर अधिकाऱ्यांशी बोललो की ते त्यांना जे योग्य वाटतं ते सांगता. पण फ्लिडवर आल्यावर शेतकऱ्यांचं जे दुखणं आहे, ते कळतं. ते सभागृहात मांडता येतं. त्यातून यांना काय मदत केली पाहिजे, ते सांगता येतं. सुरुवातीला मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्री आले होते तेव्हाही ब्रिजवरूनच पाहणी करावी लागली होती. अजून शेतात पाणी आहे. अधिकाऱ्यांना विचारलं तर ते त्यांना जे वाटतं ते सांगतात. इथे प्रत्यक्ष येऊन विचारल्यास खरी परिस्थिती कळते. अजून एकालाही मदत झालेली नाही. पंचनामेही झालेले नाहीत. फक्त त्यांचं आधारकार्ड, अर्ज घेतलेला आहे. कोतवालांनी या गोष्टी केल्या आहेत. पंचनामा झालेला नाही. दोन महिने सिझन पुढे गेल्याने नंतर जे पाणी लागणार आहे, तेव्हा पावसाळा बंद होणार आहे. त्यामुळे भाताला किंवा धानाला जे पाणी लागणार आहे, ते पाणी मिळणार नाही, अशा त्यांच्या समस्या आहेत…
महाराष्ट्रात सरकार स्थापन होऊन महिना उलटत आला तरी मंत्रिमंडळ विस्तार नाही. जिल्ह्याला पालकमंत्री नाहीत, त्यामुळे शेतकरी कुणाकडे समस्या मांडणार, असा सवाल अजित पवार यांनी विचारला. ते म्हणाले, ‘ मी आता गडचिरोली, दुपारी चंद्रपूर, उद्या वर्धा, नांदेड, बीडमध्येही जाणार आहे.उद्याच्या अधिवेशनात ते व्यवस्थित मांडून, सरकारला माहिती देईन. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री दोघंच कारभार बघत आहेत. गडचिरोली, चंद्रपूरमध्ये पालकमंत्री नेमले तर शेतकरी त्यांना जाऊन भेटू शकतात. त्यांना अडचणी सांगू शकतात. मी आता कलेक्टरलाही भेटणार आहे. 8-10 दिवस झाले, पंचनामे सुरु नाहीत, तर कारण काय आहे. स्टाफ कमी आहे का, रस्त्याची गैरसोय आहे का? आम्ही सरसकट पंचनामे जाहीर केलेत, पण एकाचेही पंचनामे सुरु झालेलं नाही. साधारण 10 लाख हेक्टर क्षेत्र बाधित झालेलं आहे. एसडीआरएफचे नियम बाजूला ठेवून मदत केली पाहिजे. शेतकऱ्यांचं कर्ज माफ झालं पाहिजे किंवा त्याचं पुनर्गठन केलं पाहिजे. शून्य टक्के व्याजाबद्दल सरकार काय निर्णय घेईल ते पाहू. उगीच अव्वाच्या सव्वा मागण्या करणार नाही. सरकार चालवायचं म्हटल्यावर काय लागतं, हे आम्हालाही माहित आहे. शेतकऱ्यांना ताठ मानेनं जगण्यासाठी काय करता येईल, हे पाहुत…