उस्मानाबाद | मशीदींतील भोंग्यांवर नमाज पठण केले जात असेल तर मंदिरांतही भोंगे लावून हनुमान चालीसा लावा, असे वक्तव्य मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी केले असून यामुळे राजकीय आणि सामाजिक वातावरण तापले आहे. मनसेतीलच (MNS) काहींनी या निर्णयाचे स्वागत केलेय तर काहींनी या वक्तव्याला फाटा दिला. उस्मानाबादमधील एका अख्ख्या गावानेही हा वाद किती मिथ्या आहे, हे दाखवून देऊन त्याचा निषेध केला आहे. उस्मानाबाद जिल्ह्यातील वाघोली या गावात मशीद व हनुमान मंदिर (Temple) जवळजवळ असून दोन्ही धार्मिक स्थळावरील भोंगे हे आमनेसामने आहेत. मंदिर-मशीद समोरासमोर उभे असले तरीही या गावात अनेक वर्षांपासून शांतता नांदतेय. वाघोलीकरांच्या या गावात हनुमानाचे मंदिर व मशीद जवळ जवळ आहेत. मशीदीतील नमाज आणि हनुमान मंदिरातील चालीसा, आरती सुरु असताना दररोज लोकांच्या सहज कानी पडते. मात्र त्यावर कोणीही एकमेकांवर हरकत घेत नाही. या गावात समाजिक शांतता असून हिंदू मुस्लिम सण एकत्र येऊन साजरे केले जातात.
वाघोली गावातील मंदिर आणि मशीदीचे स्थान गावकऱ्यांच्या मनात एक शांततेचं, श्रद्धेचं ठिकाण असं आहे. अनेकदा मुस्लिम भाविक हनुमान मंदिरात येऊन पूजा करतात. अनेक हिंदू भाविकही मशीदीत जातात. गावात जय श्री राम , हनुमान यांच्या जयघोषासह अल्लाह हू अकबर हा जयघोष एकत्र ऐकू येतो. जातीयवादाची बीजे पेरणाऱ्या लोक किंवा प्रवृत्तीसाठी वाघोली गावातील लोकांनी हिंदू मुस्लिम ऐक्याचा एक वेगळा आदर्श निर्माण केला आहे.
राज ठाकरे यांनी मंदिरांत भोंग्यांवर हनुमान चालीसा लावण्याचे आवाहन केल्यानंतर वाघोलीतील गावकऱ्यांनी या वक्तव्याचा निषेध केला आहे. राज्यात मंदिर-मशीदीवरून कितीही राजकारण झालं तरी आमच्या गावातील शांततेवर याचा किंचितही परिणाम होणार नाही. आमच्यातील एकजूट तसूभरही कमी होणार नाही, असा निर्धार वाघोलीकरांनी बोलून दाखवला.
इतर बातम्या-