जालना : जिल्ह्यातील घनसावंगी तालुक्यातील तिर्थपुरी येथे डोक्याला विंचू चावल्यामुळे वैष्णवी जनार्दन बारवकर या नववीत शिकणाऱ्या 14 वर्षीय मुलीचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. आईसोबत शेतात कामाला आल्यानंतर तिच्या डोक्यावर असलेल्या ओढणीत विंचू जाऊन बसला आणि काही वेळानंतर तिच्या डोक्यावर विंचवाने दंश केला. उपचारादरम्यान 14 वर्षीय वैष्णवीचा मृत्यू झाला आहे. (14 year old girl died during treatment after being bitten by a scorpion in Jalna Ghansawangi)
सध्या महाराष्ट्रात शेतकरी पेरणीसाठी कामाला लागले आहेत. चांगला पाऊस पडेल आणि पीक चांगले येईल, या आशेवर सर्व परिवार शेतामध्ये काम करताना अनेक ठिकाणी दिसून येत आहे. तिर्थपुरी येथील बारवकर परिवारही अशाच प्रकारे शेतीचे काम परिवारासह करत होते. कोरोनामुळे शाळा बंद असल्याने 14 वर्षाची वैष्णवीही आई सोबत शेतात कामासाठी गेली होती. शेतात काम करत असताना वैष्णवी हिने तिच्या जवळ असलेली ओढणी एका झाडा खाली ठेवली होती.
पाऊस पडल्याने जीव जंतू जमिनीच्या बाहेर येत असतात. वैष्णवीच्या ओढणीमध्ये विंचू जाऊन बसला. शेतात पालकांसोबत काम संपले आणि वैष्णवी हिने झाडाखाली ठेवलेली ओढणी डोक्यावर घेतली. याच वेळी विंचवाने वैष्णवीच्या डोक्यावर दंश केला. डोक्यात वेदना होत असल्याने वैष्णवी हिने हा प्रकार तिच्या आईला सांगितला.
वैष्णवीच्या आईने ओढणी बघितली तर त्यात विंचु असल्याचे त्यांना दिसले. विंचवाने दंश केल्याने त्याच्या विषामुळे वैष्णवीच्या डोक्यात प्रचंड वेदना होत होत्या. आईने मुलीला होणाऱ्या वेदना लक्षात येताच वैष्णवीला तिर्थपुरी येथील खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. परंतु विंचवाने दंश केल्याने विष डोक्यात भिनले होते.
वैष्णवीला खाजगी रुग्णालयातून जालना येथील शासकीय रुग्णालयात हलवण्यात आले, परंतु उपचार सुरु असताना नियतीने घात केला आणि वैष्णवीला आपला जीव गमवावा लागला. तिर्थपुरी येथील मत्सोदरी विद्यालयात शिकणाऱ्या वैष्णवीच्या अकाली मृत्युमुळे तिर्थपुरी परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
(14 year old girl died during treatment after being bitten by a scorpion in Jalna Ghansawangi)
हे ही वाचा :
जळगाव जिल्हा सहकारी दूध संघाच्या नोकरभरतीत घोटाळा? खडसे म्हणतात, प्रक्रिया ऑनलाईन!
आषाढी एकादशी वारी प्रतिकात्मक स्वरुपात करण्याचा प्रस्ताव, पुढच्या आठवड्यात अंतिम निर्णय शक्य