अकोला : जिल्ह्यातल्या आलेगाव सर्कलमध्ये पाण्यात युरिया टाकून वन्य प्राण्यांची शिकार केली जात होती. ही शिकार करणाऱ्या टोळीला वन विभागाने (Forest Department) अटक केली आहे. ही टोळी पाण्यात युरिया टाकून ठेवायची. हे पाणी प्राण्यांनी पिल्याने त्यांचा मृत्यू व्हायचा. युरियाचं पाणी पिल्याने आतापर्यंत 15 ते 16 माकडांची व रोही ( नीलगाय ) आणि काळवीट याची शिकार केली आहे. याची माहिती वन विभागाच्या अधिकाऱ्यांना आणि कर्मचाऱ्यांना मिळाली. त्यांनी लगेच त्या ठिकाणी जाऊन तिघांना अटक केली. त्यांच्याकडून युरियाचं पोत, रक्ताने भरलेली सुरी, कोयता, कुऱ्हाड, रक्ताने भरलेलं लाकूड असे साहित्य जप्त केले. ही टोळी प्राण्यांची शिकार (Animal Hunting) करून त्याचे मांस व कातडे विकायचे. या टोळीचा वन विभागाने पर्दाफाश केला. त्यांना पातूर ( Pathur) येथील न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने त्यांना तीन दिवसांची वनकोठडी सुनावली आहे.
आलेगाव सर्कलमध्ये माकडांचा मृत्यू होत असल्याची बाब समोर आली. हे मृत्यू कशानं होत आहेत. याचा शोध वनविभागानं घेतला. तेव्हा धक्कादायक बाब समोर आली. पाण्याअभावी हे मृत्यू होत नव्हते. माकडं मृतावस्थेत सापडत होते. बाजूला शोध घेतला असता. पाणी पिल्यानंतर ते मृ्त्यूमुखी पडत असल्याची बाब समोर आली. कारण त्या पाण्यामध्ये युरिया मिक्स केला जात होता.
ही गंभीर बाब असल्याचं वनविभागाच्या लक्षात आलं. याप्रकरणी चौकशी करण्यात आली. तीन जणांना अटक करण्यात आली. त्यांच्याकडं युरियाचं पोतं सापडलं. रक्तानं भरलेला सुराही सापडला. शिवाय कुऱ्हाड, कोयता असे शस्त्र जप्त करण्यात आले. हे शिकारी प्राण्यांचे मांस विकायचे. तसेच कातड्याचीही विल्हेवाट लावायचे. या तीन आरोपींना अटक करण्यात आली आहे. आणखी काही जण यात लिप्त असल्याची शक्यता आहे. वनविभागाचे कर्मचारी या प्रकरणाचा तपास करत आहेत. रोही, काळवीटाची शिकार करून त्यांचे मांस विकले जात होते. शिवाय त्यांचे चांभडे विकले जात होते. वन्यप्राण्यांच्या जीवावर उठणाऱ्यांना आता कैदेत दिवस काढावे लागतील.