अहमदनगर : मागील अनेक दिवसांपासून कोरोना रुग्णांची संख्या वाढत असताना या संकटाचे ढग आणखी गडद होताना दिसत आहेत. अहमदनगर जिल्ह्यातील पारनेर येथील टाकळी ढोकेश्वरच्या नवोदय विद्यालयात काल म्हणजेच 26 डिसेंबर 2021 रोजी तब्बल 31 विद्यार्थी कोरोना पॉझिटिव्ह आढळले होते. तर आज पुन्हा एकदा याच नवोदय विद्यालयातील आणखी 20 विद्यार्थ्यांना कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे. या विद्यालयातील बाधितांचा आकडा आता 70 वर गेला आहे. ही संख्या आणखी वाढण्याची शक्यता आहे.
अहमदनगर जिल्ह्यातील पारनेर येथील टाकळी ढोकेश्वरच्या नवोदय विद्यालयात काल 31 विद्यार्थ्यांना कोरोनाची लागण झाली होती. त्यानंतर या विद्यार्थ्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तसेच या विद्यार्थ्यांच्या संपर्कात आलेल्या इतर विद्यार्थ्यांचीदेखील कोरोना चाचणी करण्यात आली होती. याच विद्यार्थ्यांचा कोरोना चाचणी अहवाल आला आहे. यातील वीस विद्यार्थ्यांना कोरोनाची लागण झाली असून त्यांना पारनेर येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. मिळालेल्या माहितीनुसार या विद्यालयात चारशेहून अधिक विद्यार्थी शिक्षण घेतात. पॉझिटिव्ह आलेल्या विद्यार्थ्यांच्या स्वॉबचे नमुने ओमिक्रॉनच्या चाचणीसाठी पाठवण्यात आले आहेत.
या नवोदय विद्यालयातील कोरोनाबाधित विद्यार्थ्याांची संख्या तब्बल 70 वर पोहोचल्यामुळे येथील यंत्रणा सतर्क झाली आहे. बाधित रुग्णांच्या संपर्कातील इतर विद्यार्थ्यांचीदेखील कोरोना चाचणी करण्यात येणार आहे. तसेच इतर विद्यार्थ्यांना कोरोना प्रतिबंधक नियम पाळण्याचे आवाहन नवोदय विद्यालय प्रशासन तसेच स्थानिक आरोग्य विभागाने केले आहे.
दरम्यान, कोरोनाग्रस्तांची संख्या सातत्याने वाढत असल्यामुळे राज्य सरकार सतर्क झाले आहे. आज झालेल्या बैठकीत लसीकरणाचा वेग वाढवण्याची गरज असण्यावर एकमत झाले. तसेच कोरोना प्रतिबंधक नियम आणि नागरिकाचे सहकार्य यावरदेखील बैठकीत चर्चा करण्यात आली. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक पार पडली.
इतर बातम्या :