वाशिम : माहिती तंत्रज्ञान अद्ययावत होण्यापूर्वी पत्रव्यवहारासाठी पत्रांचा वापर व्हायचा. त्यासोबतच मनातील भावना व्यक्त करण्यासाठी प्रेमीयुगलामध्येही प्रेमपत्रांची देवाणघेवाण व्हायची. परंतु मोबाईल आणि इंटरनेटच्या क्रांतीने पत्रांचा काळ मागे पडला. वाशिम जिल्ह्यातील एका हौशी शिक्षकाने आपला छंद जोपासत त्या काळातील हजारो प्रेमपत्रांचा संग्रह केला आहे. कारंजा लाड येथील गणपती, चित्रकात्रण व मूर्ती संग्राहक गोपाल खाडे या शिक्षकाने प्रेमपत्रांचा संग्रह केला. याशिवाय संग्रहित प्रेमपत्रांचे ४ ठिकाणी मोठ्या उत्साहात प्रदर्शन मांडले होते.
कारंजा तालुक्यातील जिल्हा परिषद शाळा कामरगाव येथे शिक्षक गोपाल खाडे कार्यरत आहेत. गोपाल खाडे यांनी विविध प्रेमपत्र संग्रहित केले आहेत. अनेक ठिकाणी या दुर्मिळ प्रेमपत्रांची त्यांनी प्रदर्शनीसुद्धा भरवले होते.
चॉकलेट,भेटवस्तु, शुभेच्छापत्रे देऊन अनेकजण प्रेम व्यक्त करतात. मात्र प्रेम व्यक्त करण्यासाठी प्रेमपत्र हा विकल्प प्रेमीयुगलामध्ये जास्त असायचा. प्रेमपत्र जरी इतिहास जमा झाले असले तरी प्रेमाच्या भावना आणि प्रेमपत्र चिरकाल टिकून ठेवण्यासाठी शिक्षक गोपाल खाडे यांनी हा संग्रह केला. हा संग्रह पाहण्यासाठी, वाचण्यासाठी अनेकजण त्यांना भेटी देत आहेत.
गोपाल खाडे म्हणाले, व्हॉट्सअपच्या जगात पत्रलेखन ही कला दुरापास्त होत चालली आहे. प्रेमपत्र हा विषय दुर्मिळ होईल की, काय असा विचार लोकांच्या मनात येत आहे. काही वर्षांपूर्वी वर्तमानपत्र, साप्ताहिकांत प्रेमपत्र प्रकाशित व्हायची. या माध्यमातून लोकांना भावना व्यक्त करण्याची संधी मिळायची. त्यावेळी ही पत्र संग्रहित करून ठेवली. रिद्धपूरला या प्रेमपत्रांचं प्रदर्शन भरविलं.
अंकूर साहित्य संघाच्या संमेलनात ही संधी मिळाली. तिथला प्रतिसाद पाहता गोपाल खाडे यांनी अकोला, अमरावती, धुळे येथेही या प्रेमपत्रांचं प्रदर्शन भरवलं. लोकांनी चांगला प्रतिसाद दिला. लहानांपासून मोठ्यांपर्यंतचा प्रेक्षक येथे भेट देऊन गेला. लोकांच्या बोलीभाषेतील प्रेमपत्र या संग्रहात आहेत. लेखकांनी ही प्रेमपत्र लिहिलेली आहेत. त्यामुळं लोकांना ही प्रदर्शनी आवडली असल्याचं गोपाल खाडे यांनी सांगितलं.