चंद्रपूर : आपण लाल दिव्याच्या गाडीत बसावे, असे स्वप्न उराशी बाळगून स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या तरुणांच्या आयुष्यात येणाऱ्या वादळांची, संघर्षाची, नैराश्येची कहाणी आता रुपेरी पडद्यावर येत आहे. यशस्वी होणाऱ्या तरुण-तरुणींचे कौतुक समाजात नंतर होते. मात्र त्यापूर्वी या युवकांना कोणत्या वणव्यातून जावे लागते. याचे चित्रण ‘यथावकाश : कहाणी स्पर्धा परीक्षावाल्यांची’ या चित्रपटातून समोर येणार आहे. ‘यथावकाश : कहाणी स्पर्धा परीक्षावाल्यांची’ हा चित्रपट येत्या 26 जानेवारीला प्रदर्शित होतोय. विशेष म्हणजे या चित्रपटाची निर्मिती स्पर्धा परीक्षा देणाऱ्या तरुणांनीच केलीय.
या चित्रपटाचे लेखक आणि दिग्दर्शक अविनाश शेम्बतवाड यांनी स्वतः स्पर्धा परीक्षेची तयारी केली. त्यात यशस्वीही झाले. शेम्बतवाड सध्या चंद्रपूर जिल्ह्यातील गोंडपिंपरी येथे नायब तहसीलदार म्हणून आता रुजू झालेत. सहा महिन्यांच्या परीविक्षाधीन कालावधीनंतर ते तहसीलदार होणार आहेत. म्हणजेच त्यांच्याकडे लाल दिव्याची गाडी येणार.
‘माझी लाल दिव्याची गाडी, तुमच्या दारावरून जाईल, तवा कळेल माझी पावर आणि तुमची लायकी’, असा आत्मविश्वास अधोरेखित करणाऱ्या या रॅप सॉंगच्या ओळी यु-ट्यूबवर धमाल करीत आहेत.
हे रॅप गाणे प्रचंड लोकप्रिय ठरले आहे. हे गाणे यथावकाश या चित्रपटाचा महत्त्वाचा भाग राहणार आहे. यापूर्वी शिक्षणाचा बाजार आणि आयआयटीच्या मुलांचा संघर्ष, यावर कोटा फॅक्टरी ही वेबसिरीज गाजली आहे. आता स्पर्धा परीक्षा आणि त्यात यशस्वी होण्यासाठी धडपडणाऱ्या तरुण-तरुणींची कथा या चित्रपटाच्या माध्यमातून आपल्यापुढे येणार आहे. असं लेखक अविनाश शेम्बतवाड यांनी सांगितलं.
हा चित्रपट लोकप्रियता, अर्थार्जन यासाठी बनवलेला नाही, तर त्यातून स्पर्धा परीक्षा देणाऱ्या तरुण-तरुणींचे भावविश्व जगापुढे आणण्याचा प्रयत्न केलाय, असे दिग्दर्शक सांगतात. या चित्रपटाच्या माध्यमातून एका नव्या विषयावर झोत टाकला जातोय. तो किती परिणामकारक ठरतोय, हे पाहणे महत्त्वाचे आहे.