चंद्रपूर : राज्यातील प्राथमिक आरोग्य केंद्र म्हणजे आजार आणि त्यावरील उपचारासाठी एक मोठी प्रयोगशाळा आहे. चंद्रपूरच्या एका वैद्यकीय अधिकाऱ्याने जिल्ह्यातील बेंबाळ प्राथमिक आरोग्य केंद्राच्या कार्यक्षेत्रात एक सर्व्हेक्षण राबविले. यात महिला आणि विशेषतः गरोदर महिलांमध्ये रक्तक्षय अर्थात अॅनेमियाचे प्रमाण 60 टक्क्यांहून अधिक असल्याचे आढळले. शास्त्रीय पद्धतीने घरोघर जाऊन प्रत्यक्ष स्वयंपाक घरात डोकावून हे सर्वेक्षण करण्यात आले. या सर्व्हेक्षणातील निष्कर्ष धक्कादायक होते. ॲनेमियाचे मुख्य कारण लोह कमतरता आहे. या महिलांच्या घरी अॅल्यूमिनीअमच्या किंवा स्टीलच्या भांड्यांमध्ये स्वयंपाक केला जात होता. या गावातील सर्वच घरांमध्ये रोजचा स्वयंपाक लोखंडाच्या भांड्यात केला जात नव्हता.
महिलांच्या रोजच्या आहारात लोह प्रमाण शून्य होते. यावर उपाय म्हणून स्थानिक ग्रामपंचायतींना विश्वासात घेत डॉक्टर किशोर भट्टाचार्य यांनी चक्क लोखंडी भांडी वितरणासाठी मिशनच हाती घेतले आहे. या उपक्रमाला ग्रामपंचायत सदस्य आणि गावातील लोकांचे उत्तम सहकार्य लाभत आहे.
ग्राहक रोजच्या स्वयंपाकासाठी लोखंडाची भांडी विकतच घेत नसल्याचे विक्रेत्यांनी लक्षात आणून दिले. आपल्याकडे लोखंडाच्या सर्वच भांड्यांची रेंज उपलब्ध आहे. मात्र स्वच्छतेची बाब लक्षात घेता आणि आधुनिक स्वयंपाक घर पाहता लोखंडाची भांडी स्वयंपाक घरातून हद्दपार झाली असल्याचे विक्रेत्यांनी लक्षात आणून दिले. अॅल्युमिनियम, नॉनस्टिक आणि आता त्याहून अधिक सुबक अशी भांडी रोजच्या चलनात आलीत. त्यामुळे महिलांना आपसूक मिळणारे लोहसत्व दुरावले आहे. परिणामी रक्तक्षयासारखे गंभीर आजार उद्भवत असल्याचे भांडी विक्रेते समीर साळवे यांनी सांगितले.
अत्यंत साध्या सोप्या कृतीतून स्वयंपाक घरात लोखंडी भांडी वापरल्यास गरोदर महिला असलेल्या घरांमध्ये लोहसत्वाची पूर्तता केली जाऊ शकते. रक्तक्षयावर वेळीच उपाययोजना न केल्यास मृत्यूस कारणीभूत ठरू शकतो. अॅनेमियासाठी औषधे आहेतच. मात्र सतत आणि खर्चिक औषधोपचारापेक्षा स्वयंपाकघरात लोखंडी भांडी वापरण्याची अंमलबजावणी केल्यास रक्तक्षयासारखा आजार नियंत्रणात आणला जाऊ शकतो. डॉक्टर किशोर भट्टाचार्य यांच्या या पुढाकाराचे मात्र जिल्हाभरातून कौतुक होत आहे. विशेष म्हणजे स्थानिक ग्रामपंचायती देखील या उपक्रमाला हातभार लावायला पुढे सरसावल्या आहेत.