पुणे: बिगबॉस फेम कवी मनाचे नेते अभिजीत बिचुकले नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत असतात. कधी त्यांच्या हटके फॅशनमुळे चर्चेत असतात, कधी त्यांच्या विधानाने चर्चेत असतात, कधी मातब्बर नेत्यांच्या विरोधात निवडणूक लढत असल्याने चर्चेत येतात तर कधी मुख्यमंत्री बनण्याची आपल्या मनातील सुप्त इच्छा बोलून दाखवत चर्चेत येतात. चर्चा आणि अभिजीत बिचुकले हे जणू समीकरणच झालं आहे. आज अभिजीत बिचुकले आणखी एका कारणाने चर्चेत आले आहेत. त्याला कारणही खास आहे. त्यांच्या लग्नाचा आज वाढदिवस आहे. त्यानिमित्ताने त्यांनी त्यांची पत्नी अलंकृता यांना आपल्या स्वभावानुसारच हटके पत्रं लिहिलं आहे, या पत्रामुळे सध्या ते चर्चेत आहेत.
अभिजीत बिचुकले यांच्या लग्नाचा आज वाढदिवस आहे. त्यानिमित्ताने त्यांनी त्यांची पत्नी अलंकृता बिचुकले यांना हटके पत्रं लिहिलं आहे. तुम्ही महाराष्ट्राच्या पहिल्या महिला मुख्यमंत्री व्हाल, अशा हटके शुभेच्छा अभिजीत बिचुकले यांनी दिल्या आहेत.
तसेच माझी जीवनसाथी म्हणून साथ निभावत आहात. त्याबद्दल धन्यवाद, अशी कृतज्ञताही त्यांनी व्यक्त केली आहे. त्यामुळे अभिजीत बिचुकले यांचं हे काहीसं हटके आणि हळवं पत्रंही चर्चेचा विषय बनलं आहे.
कवी मनाचे नेते
अभिजीत वामनराव आवाडे – बिचुकले
The Real Big Boss
25 डिसेंबर 2022
महाराष्ट्राच्या पहिल्या भावी महिला मुख्यमंत्री सौ. अलंकृताजी
आपण माझी जीवनसाथी म्हणून जी साथ निभावत आहात त्यासाठी धन्यवाद ! आणि आपल्या लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !
कोणीही लग्नासाठी घातली नसेल अशी होती माझी मागणी ! आज आठवते आपल्या प्रेमाची जगावेगळी प्रेम कहाणी ।।
मी सांगितले तुम्हाला, अशाच मुलीशी करेन मी लग्न जिचे विचार असतील माझ्या सामाजिक व सांस्कृतिक विचारांशी संलग्न ।।
म्हणालो होतो, मी आपणांस साताऱ्यातून उदयनराजेंच्या विरोधात उभे करणार ते ऐकूण तुम्ही दिलात होकार आणि सांगितले मी ही तुमची इच्छा पूर्ण करणार ।।
2009 साली उदयनराजेंच्या विरोधात उभी राहणारी ठरलात तुम्ही एकमेव महिला, साताऱ्यातच नव्हे तर महाराष्ट्रातही तुमच्या नावाला मिळतो मान पहिला ।।
मीच केली तुम्हाला महाराष्ट्राची पहिली महिला मुख्यमंत्री करण्याची घोषणा, आहे खात्री मला तुम्हीच न्याय दयाल नक्की सर्व सामान्य जना ।।
गुरुदेव श्री. श्री. बाबा आणि आईचा आहे आपल्यावर खूप सारा आशिष, कधीच झुकणार नाही कोणा पुढेही आपल्या दोघांचे शिष ।।
प्राध्यापिका, योग शिक्षिका, सुगरण अशी आहात तुम्ही अष्टपैलू गृहिणी, संपूर्ण व्यक्तिमत्वातून दिसते तुमच्या साधी राहणी आणि उच्च विचारसरणी ।।
चि. अहम महाराज व अस्मि ताईसाहेब यांच्या संगोपनातही नाही पडत तुम्ही कमी, वारसा आपल्या घराण्याचा उज्ज्वल करणार आपण याची आहे हीच हमी ।।
स्त्रीत्वाचा अभिमान तुम्हाला आणि स्त्रियांच्या सर्व प्रश्नांची आहे तुम्हाला जाण, तुम्हीच पहिली महिला मुख्यमंत्री व्हाल तरच वाढेल खरोखर महाराष्ट्राची शान ।।
शिवछत्रपती, शाहु-फुले-आंबेडकरांच्या विचारांची धरली आहे आपण कास, हीच प्रार्थना श्रींच्या चरणी की व्हावे तुमच्या हातून नेहमीच जनतेचे कार्य खास ।।
अभिजीत वामनराव आवाडे – बिचुकले