कोल्हापूर / भूषण पाटील : कुटुंबासोबत पन्हाळगडावर पिकनिकसाठी आलेल्या चिमुरड्याचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना कोल्हापुरमध्ये घडली आहे. या घटनेमुळे कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. पन्हाळगडावरील तबक उद्यानाजवळ आज दुपारी तीन वाजता ही घटना घडली. रस्ता ओलांडून पलीकडे उभ्या असलेल्या आजोबांकडे जात असताना त्याचा अपघात घडला. मुलाच्या दुर्दैवी मृत्यूमुळे परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. पीडित कुटुंब भुदरगड तालुक्यातील खानापूर येथील रहिवासी असून, पन्हाळगडावर फिरायला आले होते. याच दरम्यान ही दुर्दैवी घटना घडली.
भुदरगड येथील कुटुंब आपल्या मित्रपरिवारासह ज्योतिबाहून पन्हाळा पाहण्यासाठी आले होते. यावेळी सज्जाकोटी पाहण्यासाठी जात असताना ते तबक उद्यानासमोर एका चहाच्या टपरीवर चहा घेण्यासाठी थांबले होते. यावेळी सर्वजण फोटो काढण्यात गुंतले होते. यावेळी दोन वर्षाचा चिमुरडा आईचा हात सोडून रस्त्याच्या पलिकडे उभ्या असलेल्या आजोबांकडे जाण्यासाठी धावला. याचदरम्यान रस्ता ओलांडताना सज्जाकोटीकडून येणाऱ्या भरधाव कारच्या चाकाखाली आला.
गंभीर जखमी मुलाला स्थानिकांच्या मदतीने पन्हाळा ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आले. पन्हाळा ग्रामीण रुग्णालयातील रुग्णवाहिका चालक नसल्याने बंद अवस्थेत आहे. त्यामुळे 108 रुग्णवाहिका बोलावण्यात आली. यामध्ये एक तासाचा वेळ गेला. पन्हाळा ग्रामीण रुग्णालयातून मुलाला कोल्हापूर शासकीय रुग्णालयात नेण्यात आले. मात्र तेथे डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. तबक उद्यानाजवळील गर्दी, रस्त्यावरील अतिक्रमण आणि वाहतुकीचा बेशिस्तपणा यामुळे वारंवार असे अपघात होत असतात.