चंद्रपूर / निलेश डहाट : भरधाव वेगात स्पोर्ट्स बाईकवरुन फिरायला जात असताना महामार्गावर बाईकवरील नियंत्रण सुटल्याने झालेल्या अपघातात दोन तरुणांचा मृत्यू झाला आहे. दोघे तरुण मित्र होते. भद्रावती तालुक्यातील चंदनखेडा फाट्याजवळील नागपूर-चंद्रपूर महामार्गावर ही घटना घडली. दोघेही तरुण वरोरा शहरातील रहिवासी आहेत. हर्षल पाचभाई आणि अंकुश भडगरे अशी मयत तरुणांची नावे आहेत. भद्रावतीला जात असताना पोलिसांच्या महामार्गावरील बॅरिकेटला बाईकने जोरदार धडक दिली. ही धडक इतकी जोरदार होती की एका तरूणाचा जागीच मृत्यू झाला, तर दुसऱ्याला रुग्णालयात नेत असताना वाटेत मृत्यू झाला.
हर्षल पाचभाई हा पॉलिटेक्निक द्वितीय वर्षात परतवाडा येथे शिकत होता. तर अंकुश स्वतःचा तेलघाणी आणि रियल इस्टेटचा व्यवसाय करीत होता. अंकुश आणि हर्ष बीएमडब्ल्यू जी 310 आरआर बाईकवरून प्रवास करत होते. ही बाईक अंकुश याच्या मालकीची असून, या बाईकची किंमत 3 लाख रुपयांच्या आसपास असल्याचे सांगितले जात आहे.
दोघे मित्र आपली रेसर बाईक घेऊन वरोऱ्याहून भद्रावतीकडे फिरण्यासाठी भरधाव निघाले. अचानक मानोरा फाट्याजवळ दुचाकीलरील नियंत्रण सुटले. यानंतर अनियंत्रित बाईक महामार्गावरील बॅरिकेटवर आदळली. दोन्ही तरुणांनी बाईक चालवताना डोक्यात हेलमेट घातले नव्हते. भीषण अपघातात एकाचा जागीच मृत्यू तर दुसऱ्याचा उपचारार्थ नेत असताना मृत्यू झाला.
परभणीच्या पूर्णा तालुक्यातील गौर येथे पूर्णा-नांदेड महामार्गावर वेगात जाणाऱ्या चार चाकीचा अपघात झाल्याची घटना घडली. भरधाव वेगात असलेली कार रस्त्याच्या कडेला असलेल्या शेतात जाऊन आदळली. कारमध्ये बसलेले पूर्णा येथील शिवसेना ठाकरे गटाचे शहर प्रमुख आणि एक सरपंच हे दोघे अपघातात गंभीर झाले आहे.