सोलापूर : सबसे कातील गौतमी पाटील म्हणून गौतमी पाटील घराघरात लोकप्रिय आहे. तिच्या कार्यक्रमाला पब्लिकची झुंबड उडत असते. गौतमी आपल्या तालुक्यात येणार हे कळताच हजारो पब्लिक कार्यक्रमाच्या ठिकाणी दाखल होते. गौतमीच्या कार्यक्रमात बसायला जागा नसते त्यामुळे अनेकदा राडाही होतो. तिच्या अतिउत्साही चाहत्यांना पोलिसांच्या लाठींचा प्रसादही बसतो. गौतमीची संपूर्ण राज्यात क्रेझ असतानाच तिच्या नृत्यावर काही जणांनी आक्षेप घेतला होता. त्यानंतर तिने माफीही मागितली होती. त्यानंतर पुन्हा एकदा तिच्या नृत्यावर आक्षेप घेण्यात आला आहे. प्रसिद्ध अभिनेत्री आणि नृत्यांगना माधुरी पवार हिने गौतमीच्या नृत्यावर आक्षेप घेत तिच्यावर टीका केली आहे.
अभिनेत्री माधुरी पवारने नाव न घेता गौतमी पाटीलला सल्ले दिले आहेत. सोलापूरच्या माढ्यातील मोडनिंबमध्ये tv9 मराठीशी संवाद साधताना तिने हे सल्ले दिले आहेत. गौतमी सादर करीत असलेला नृत्य प्रकार कोणता आहे हे मला तर माहिती नाही. सादर करणाऱ्याला कळावं आपणा कोणता प्रकार करतोय तो. मी तर तिचा कार्यक्रम पाहिलेला नाही. पाहिल्यावरच समजेल कोणता नृत्य प्रकार आहे तो. सध्या तरी आवर्जून पहायला जायला मला वेळ नाही, असं माधुरी पवार म्हणाली.
माधुरीने यावेळी गौतमीच्या आडनावावरून चाललेल्या वादावरही भाष्य केलं. आडनाव बदलावं की नाही हा ज्याचा त्याचा वैयक्तिक प्रश्न आहे. मी तर माझ्या वडिलांकडून आलेलंच आडनाव ठेवलं आहे. संघटनांनी आक्षेप घ्यावं असं तरी माझ्याकडून काहीही घडलेलं नाही, असा टोलाही माधुरीने गौतमीला नाव न घेता लगावला. कलावंतांची कुटुंब छान आनंदात एकत्रित राहणं गरजेचं आहे, असंही ती म्हणाली.
माझ्या 15 वर्षाच्या कार्यकाळातील कार्यक्रमात एकदाही हुल्लडबाजी, धक्काबुकी झाली नाही. मी करीत असलेल्या नृत्यांना प्रेक्षकही प्रतिसाद देतात. अनेकजण कार्यक्रमानंतर भेट घेऊन कलेचे कौतुक करतात. एखाद्याकडेच जर आक्षेप घेऊन बोटं दाखवले जात असेल तर आपण कुठं चुकतोय का? हे आप आपल्याल कळणं महत्त्वाचं आहे. चुकीचं होत असेल तर बदलावं. योग्य असेल तर तसंच सुरु ठेवावं. लोककला छान आहे.जिवंत रहायला हवी, असंही ती म्हणाली.
कार्यक्रमाच्या बंदोबस्तावरील खर्चावरही तिने प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. सोलापूर जिल्हात 5 लाख भरल्या शिवाय कार्यक्रमाला पोलिसांकडून परवानगी मिळत नसेल तर हे फार अवघड आहे. ज्यांना इच्छा आहे तेच 5 लाख भरतील. मात्र ज्यांना शक्य नाही ते दुसरे कलावंत बोलावतील. बंदोबस्त खर्चाचा इफेक्ट् आमच्यावर होणार नाही, असंही तिने स्पष्ट केलं.