अकोला : तापमानाच्या बाबतीत नेहमीच चर्चेत राहणारे अकोला पुन्हा आता चर्चेत आलं आहे. अकोला जगातील सर्वाधिक हॉट शहर ठरले आहे. अकोल्यात देशात सर्वाधिक म्हणजेच 44.1 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे. सर्वाधिक तापमान असणाऱ्या जगातील शहरांमध्ये अकोल्याचा पहिला क्रमांक आला आहे. हवामान अभ्यासकांकडून उष्णतेच्या लाटेची (heat wave) शक्यता व्यक्त केली जात आहे. वाढत्या तापमानामुळे जनजीवन प्रभावित होत आहे. दुपारी रस्ते सुमसाम झाले. या उन्हामुळे आरोग्याच्या अनेक तक्रारी समोर येत आहेत. उष्माघाताचा धोका (heatstroke threat) वाढल्याने अतिजोखमीतील कारणांमुळे नागरिकांना सुरक्षात्मक खबरदारी योजना घेण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात येत आहे. अशातच जुने शहर पोलीस (Old City Police) हद्दीत आग लागून गोदामाचे फार मोठे नुकसान झाले. अहमद नौशाद यांच्या गोदामाला आग लागली.
वाशिम जिल्ह्यातील मालेगाव शहरात, सावरकर प्लॉटमध्ये राहणाऱ्या सलीम खान पठाण यांच्या घराला वाढत्या तापमानामुळे आग लागली. आगीने रौद्र रूप धारण केले. त्यानंतर त्या घरात गॅस सिलिंडरचा स्फोट झाला. हा स्फोट एवढा भीषण होता की त्यामुळे या घराच्या बाजूला असणारे शाहिदाबी नूर खान, अताउल्ला खान यांच्याही घराला आग लागली. हे तीनही घरं पूर्णपणे जळून खाक झालेत. या आगीत घर संसार उपयोगी साहित्य जळून खाक झाल्याने लाखोंचं नुकसान झालं आहे. महसूल व पोलीस विभागाचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. आग विझवण्यात आली. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही.
यवतमाळ शहरातील मुख्य बाजारपेठेतील चिंतामणी कॉम्प्लेक्समधील फोम हाऊसच्या गोदामाला आग लागली. आगीत दुकान जळून खाक झाले. दुकानातील फोम, सोफासेट साहित्य होते. शॉर्टसर्किटमुळे आग लागल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. अग्निशमन दलाचे आग विझविण्यासाठी बोलाविण्यात आले. आगीवर नियंत्रण मिळविण्यात आले.