अहमदनगर : संगमनेर तालुक्यातील समनापूर गावात आज दोन गटात वाद झाल्याची माहिती समोर आलीय. संगमनेरमध्ये आज सकाळी मोर्चा काढण्यात आला होता. हा मोर्चा दुपारी साडेबारा वाजेपर्यंत आटोपला. त्यानंतर मोर्चात सहभागी झालेले आपापल्या घरी परतत असताना संगमनेर तालुक्यापासून 5 ते 6 किमी अंतरावर असलेल्या समनापूर गावात दोन गटात वाद झाल्याची घटना घडली. यावेळी दगडफेकदेखील झाली. दोन-तीन गाड्यांच्या काचा फोडण्यात आल्या. तसेच दोन जण जखमी झाले. संबंधित घटना नेमकी कशी घडली याविषयी सनमापूरचे प्रसिद्ध वडापाव विक्रेते अन्सार चाचा यांनी ‘टीव्ही 9 मराठी’ला प्रतिक्रिया दिली.
अन्सार चाचा यांचं समनापूरमध्ये वडापावचं प्रसिद्ध दुकान आहे. अन्सार चाचा यांचे सोशल मीडियावर अनेक व्हिडीओ व्हायरल होत असतात. ते वडापावच्या दुकानावर येणाऱ्या ग्राहकांसोबत अनोख्या शैलीत बोलतात. त्यामुळे ते लोकप्रिय झाले आहेत. अहमदनगरमधील आजची घटना ही त्यांच्या वडापावच्या दुकानाजवळ घडली. त्यामुळे नेमकी घटना काय घडली याबाबतची माहिती आम्ही त्यांच्याकडून जाणून घेण्याचा प्रयत्न केला.
“ज्यावेळेस तिकडून मेळावा सुटला तेव्हा काही मुलं वाकडेतिकडे शब्द बोलत चालले होते. पेट्रोल पंपच्या समोरच्या बाजूला काही मुस्लिम समाजाचे मुलं उभे होते. यावेळी बुलेरो गाडी एका मुलाच्या अंगावर नेली. त्यानंतर त्यांनी दगडफेक सुरु झाली. पहिले यांच्याकडून दगडफेक झाली नाही. ते मोर्चातून आले होते त्यांनी दगडफेक सुरु केली. मग तिथून पुढे सुरु झालं. मग बरेच लोकं जमा झाले आणि मग त्यांनाच लागलं”, असं अन्सार चाचांनी सांगितलं.
“जसा मी जन्माला आलो, जसं मला समजायला लागलं, तेव्हापासून आजपर्यंत आमच्या गावात सर्व एकदम गोड गुलाबीने, आनंदाने राहतोय. आमच्यात कधीच भांडण झालं नाही. आज जे झालंय, हे जे गालबोट लागलंय, याला फक्त बाहेरचे लोक कारणीभूत आहेत. गावातल्या माणसाने कुणीही दगडफेक केलेली नाही. कुणीच कुणाला काही बोललेलं नाही”, अशी प्रतिक्रिया अन्सार चाचा यांनी दिली.
“माझे 99 टक्के गिऱ्हाईक हे मराठा समाजाचे आहेत. तसेच माझे मित्रही मराठा समाजाचे आहेत. आजपर्यंत असं कधी घडलेलं नाही. हे जे घडलं, ज्या लोकांनी दगडफेक केली ते आमच्या गावातले नव्हते. आमच्या गावातले लोकं कधीही दगडफेक करु शकत नाहीत”, असा दावा अन्सार चाचांनी केला.
“प्रत्येकाने शांततेने वागलं पाहिजे, असं माझं मत आहे. विनाकारण भांडणं करुन काही स्वार्थ साधणार नाही. तसेच काही हातीदेखील लागणार नाही”, असं अन्सार चाचा म्हणाले.
“मी प्रत्येकाला सांगू इच्छितो की, खूप चांगलं राहायला पाहिजे. प्रचंड प्रेमाने राहिलं पाहिजे. महाप्रचंड प्रेमाने राहायला पाहिजे. भांडणं करुन किंवा दगडफेक करुन काहीच साध्य होणार नाही. याने देशाचंच नुकसान आहे. त्यामुळे असं करुन चालणार नाही. सर्व माणूस गुण्यागोविंदाने राहिले तर अशा भानगडी उद्भवणार नाहीत”, असं अन्सारी चाचा यांनी आवाहन केलं.
“माझी प्रचंड प्रेमाने विनंती आहे की, कमीत कमी मायबाप भांडणं करु नका. गोडी गुलाबीने, चांगल्याप्रकारे राहा अशी अपेक्षा बाळगतो. प्रचंड वेगाने शांतता राखा”, असं अन्सारी चाचा म्हणाले.