हिंगोली: राज्यातील सरकारला सात महिने झाले तरी मंत्रिमंडळात एकाही महिलेला स्थान देण्यात आलेलं नाही. राज्यात कर्तृत्वान महिला नाहीत का? 20 लोक मंत्रिमंडळात आहेत. त्यात एखादी महिला मंत्री केली असती तर काही बिघडले असते का? फक्त म्हणता महिलांना संधी देऊ. पण कधी देणार? असा सवाल करतानाच 7 महिने झाले, 9 महिन्यात तर बाळ जन्माला येतं. यांना साधा मंत्रिमंडळाचा विस्तार करता येत नाही, अशी खोचक टीका राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी केली. आधी तर दोघेच टिकोजी राव होते, असं कुठं सरकार चालत का? असा सवाल अजित पवार यांनी केला.
हिंगोली येथील सभेला संबोधित करताना अजित पवार यांनी ही टीका केली. गेल्या सात महिन्यापासून मंत्रिमंडळाचा विस्तार केला जात नाही. सगळ्यांना सांगितले जाते तुम्हाला मंत्री करतो… तुम्हाला मंत्री करतो.. ते म्हणतात कधी ? त्यांच्या घरच्यांनी सूट शिवले. फार गळा आवळायची वेळ आली पण मंत्रीपद काही मिळेना, असा मिश्किल टोला अजित पवार यांनी लगावला.
येणाऱ्या काळात लोकसभा निवडणूकित महाविकास आघाडीचाच खासदार झाला पाहिजेत. 50 खोके आणि त्यांना एकदम ओके करा, असं आवाहनही त्यांनी केलं.
राज्यात जेव्हापासून शिंदे-फडवणीस सरकार आलं तेव्हापासून कायदा सुव्यवस्थेची वाट लागली आहे. महिलेवर पाठीमागून वार होतो. हे कसं काय चालतं? आपण कसं काय सहन करतो? असा सवाल करतानाच प्रज्ञा सातव यांच्यावर भ्याड हल्ला करणारा मास्टरमाइंड कोण आहे? त्याला आधी अटक करा.
आपल्याला हल्ला करण्यास सांगितल्याचं आरोपी सांगतोय. म्हणजे या मागे नक्कीच कोणी तरी मास्टरमाइंड आहे. त्याचा शोध घेतला पाहिजे, अशी मागणी पवार यांनी केली.
रिफायनरीच्या विरोधात बातमी दिली म्हणून परवा एका पत्रकाराला चिरडून मारलं गेलं. बातम्या करणं हे पत्रकारांचं काम आहे. लोकशाहीतील चौथा स्तंभ म्हणून ते त्यांचं काम आहे. आमच्या विरोधातही बातम्या दिल्या. पण आम्ही कधी हटकले नाही. आम्ही आत्मचिंतन केले. ज्या पत्रकाराने ज्याच्याविरोधात बातमी दिली.
त्याच व्यक्तीच्या गाडीने पत्रकाराला धडक दिली. हे धाडस होतेच कसे? पत्रकाराला चिरडणारा कुणाचा कार्यकर्ता आहे हे पाहिले पाहिजे. हे असुरी काम करणाऱ्याला फाशीच झाली पाहिजे, अशी मागणीही त्यांनी केली.
उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वात आम्ही जी कामे मंजूर केली त्या कामांना या सरकारने स्थगिती दिली. हे जसे घटनाबाह्य सरकार आहे, तसेच स्थगिती सरकार आहे. 1999 पासून 2014 पर्यंत मी अनेक मंत्र्यांच्या हाताखाली काम केले. आम्ही वेगवेगळी पदे भूषवली.
मात्र आधीच्या सरकारने हाती घेतलेली कामे आम्ही कधीच थांबवली नाही. कारण ही सगळी जनतेची कामे होती. मात्र ही मंडळी अंत्यत खालच्या स्तरावर जाऊन राजकारण करत आहे, अशी टीका त्यांनी केली.