अकोला : कार आणि ट्रकच्या भीषण अपघातामध्ये अकोल्यात तिघांचा जागीच मृत्यू झाला, तर एकाने उपचारादरम्यान प्राण गमावले. अकोला शहरापासून हाकेच्या अंतरावर येत असलेल्या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहावरील रिधोरा येथील रिलायन्सच्या पेट्रोल पंपाजवळ मध्यरात्रीच्या सुमारास हा अपघात झाला. या दोन वाहनांची धडक इतकी भीषण होती, की कारचा अक्षरशः चुराडा झाला आहे. (Akola National Highway Car Truck accident kills four passengers)
समोरुन येणाऱ्या ट्रकची धडक
रात्रीच्या सुमारास प्रवास करणे तसे धोकादायकच. महामार्गावरील रस्ते आणि वाहतूक जीवघेणी ठरत असल्याची उदाहरणं अनेकदा पाहायला मिळतात. काल मध्यरात्रीच्या सुमारास राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहावर अशीच घटना घडली. शेगावकडून एमएच 37 G 8262 ही कार वाशिमकडे जात होती, त्यावेळी विरुद्ध दिशेने येणाऱ्या ट्रकने कारला जोरदार धडक दिली. या अपघातात कारमधील तिघांचा जागीच मृत्यू झाला तर गंभीर जखमी झालेला चौथा उपचारादरम्यान मृत्युमुखी पडला.
तिघांचा जागीच, एकाचा उपचारादरम्यान मृत्यू
घटनेची माहिती मिळताच बाळापूर पोलीस स्टेशनचे ठाणेदार दत्तात्रय आव्हाळ आपल्या ताफ्यासह घटनास्थळी दाखल झाले. अपघात एवढा भयंकर होता की त्यात कारचा अक्षरशः चुराडा झाला, तर तिघा जणांना घटनास्थळीच आपले प्राण गमवावे लागले. एकाला गंभीर अवस्थेत पुढील उपचारासाठी अकोला सरोपचार रुग्णालयात पाठवण्यात आले. मात्र उपचारादरम्यात जखमी व्यक्तीचा आज सकाळी मृत्यू झाला. मिळालेल्या माहितीनुसार मृतक वाशिम जिल्ह्यातील मालेगाव तालुक्यात येत असलेल्या पांगरीकुटे येथील रहिवासी होते. पुढील तपास बाळापूर पोलीस करत आहेत.
संबंधित बातम्या :
Video | ओव्हरलोडेड ट्रकचा भीषण अपघात, धड झाले वेगळे, चाक लागले रस्त्यावर पळायला, व्हिडीओ व्हायरल
चाळीसगावमधील भीषण अपघातात 4 जणांचा मृत्यू, आई, वडील आणि बहिण गमावलेला चिमुरडा गंभीर जखमी
(Akola National Highway Car Truck accident kills four passengers)