अकोला : रशियाने बुधवारी रात्रीच्या सुमारास युक्रेनच्या काही भागांमध्ये हवाई हल्ले (Ukrainian Air Strikes) केले. त्यामुळे रशिया आणि युक्रेनमधील वाद आणखीनच चिघळला आहे. अशा परिस्थितीत भारतातील सर्वच राज्य सरकारे युक्रेनमध्ये शिक्षण घेत असलेल्या आपल्या राज्यातील मुलांना मायदेशी परत आणण्यासाठी प्रयत्न करीत आहेत. युक्रेनमध्ये सध्या महाराष्ट्रातील तब्बल बाराशे विद्यार्थी अडकले आहेत. त्यामध्ये अकोला शहरातील (City of Akola) व्हीएचबी कॉलनीमधील रहिवासी असलेल्या जॅकशारोन एडवर्ड निक्सन (Jackson Sharon Edward Nixon) या वीस वर्षीय युवकाचाही समावेश आहे. जॅक या टोपण नावाने या परिसरात ओळखल्या जात असलेल्या जॅकशारोनला सध्याच्या युद्धजन्य परिस्थितीत आपल्या मायदेशी परतण्याची ओढ लागली आहे. जॅक हा युक्रेनची राजधानी असलेल्या कीव शहरातील डायलो हॅलीस्काय नॅशनल मेडिकल युनिव्हर्सिटीमध्ये एमबीबीएसचा द्वितीय वर्षाचा विद्यार्थी आहे. त्याची आई अमलमेरी निक्सन या महापालिकेच्या शाळेत मुख्याध्यापिका आहेत. युक्रेनमध्ये एकट्या महाराष्ट्रातील जवळपास बाराशे विद्यार्थी अडकले आहेत.
आंतरराष्ट्रीय विमानाचे दर वाढले. त्यामुळं मायदेशी परतणे या मुलांसाठी कठीण होत आहे. प्राप्त माहितीनुसार, सध्या युक्रेनमध्ये जवळपास वीस हजार विदेशी नागरिक आहेत. यामध्ये अठरा हजार भारतीय आणि दोन हजार विद्यार्थी आहेत. या दोन हजारांमधून विविध अभ्यासक्रमासाठी प्रवेशित जवळपास बाराशे विद्यार्थी एकट्या महाराष्ट्रातील आहेत. सर्वच राज्य सरकारांकडून आपापल्या राज्यातील मुलांसोबत संपर्क साधला जात आहे. किती विद्यार्थी आहेत. कुणाला कोणती मदत हवी, याची माहिती घेतली जात आहे. जॅकदेखील इतर मुलांप्रमाणे आपल्या पालकांच्या सतत संपर्कात आहे. काल सायंकाळी आणि आज सकाळीही जॅकसोबत संवाद झाल्याचे अमलमेरी निक्सन यांनी सांगितले.
युक्रेनमध्ये वेगवेगळ्या विद्यापीठांमध्ये शिक्षण घेत असलेले महाराष्ट्रातील जवळपास बाराशे विद्यार्थी आहेत. त्यांना मायदेशी आणण्यासाठीचे प्रयत्न सुरू आहेत. युक्रेनमधील परिस्थिती रोज भयंकर होत आहे. सर्वत्र भीतीचे वातावरण आहे. या मुलांचे भारतातील पालक चिंतेत आहेत. दर तासाला घरच्या लोकांकडून त्यांची विचारणा केली जात आहे.