अकोला: दिव्य शक्तीद्वारे मनातलं ओळखण्याचा दावा करणारे बागेश्वर बाबा पुन्हा एकदा अडचणीत सापडले आहेत. बागेश्वर बाबा यांनी संत तुकाराम महाराज यांच्याविरोधात आक्षेपार्ह विधान केलं आहे. संत तुकारामांची पत्नी त्यांना रोज मारायची, अशी मुक्ताफळे बागेश्वर बाबा यांनी उधळली आहे. त्यामुळे महाराष्ट्रात संतापाची लाट उसळली आहे. बागेश्वर बाबांच्या या विधानाविरोधात सर्वच राजकीय पक्षांनी आणि वारकरी संप्रदायांनी तीव्र शब्दात निषेध नोंदवला आहे. राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांनी तर बागेश्वर बाबांना दिसेल तिथे ठोका, अशी चिथावणीच दिली आहे.
या अशा बेताल वक्तव्य करणाऱ्या बदमाशांच्या नाजूक भागावर हल्ला केला तर यांचं थोबाड बंद होतं. त्यामुळे वारकरी संप्रदायाने आता यापुढे जिथे दिसेल तिथे त्याला ठोका… असं आवाहनच अमोल मिटकरी यांनी केलं आहे. ते मीडियाशी संवाद साधत होते.
तुझ्या सारख्यांची कोल्हे कुई सुरू असते. तेव्हा अशांच्या नाजूक भागांवर फटके दिल्यावरच यांचे तोंड बंद होतं. तुकारामांच्या भाषेत सांगायचं म्हणजे तुका म्हणे गाढव लेका, जिथे दिसेल तिथे ठोका. म्हणून त्यांना दिसेल तिथे ठोकलं पाहिजे, असं मिटकरी म्हणाले.
संत तुकाराम महाराजांचे 11 वे वंशज प्रशांत महाराज यांनीही बागेश्वर बाबांचा निषेध नोंदवला आहे. बागेश्वर बाबा सारखे अनेकजण संतांवर अवमानकारक वक्तव्य करून चरित्र हनन करत आहेत. बागेश्वर बाबांना आवाहन करतो की, त्यांनी माफी मागावी नाही तर त्यांच्या विरोधात आंदोलन करत गुन्हा दाखल करू, असा इशारा प्रशांत महाराज यांनी दिला.
बागेश्वर बाबांचं वक्तव्य एकदम खोटं होतं. संत तुकाराम महाराज घडले ते त्यांच्या पत्नीमुळे. रोज भाकरी घेऊन जात त्यावेळी तुकोबा कुठल्या डोंगरावर गेले हे जिजाबाईना माहीत नव्हते. त्यामुळे त्या प्रत्येक डोंगरावर जात होत्या. ज्या वाटेनं विठ्ठल विठ्ठलचा आवाज येईल त्या दिशेने जात होत्या. साक्षात विठोबांनी त्यांच्या पायातला काटा काढला होता, असंही प्रशांत महाराज यांनी सांगितलं.
आझाद हिंद वारकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष अॅड. सतीशचंद्र रोठे यांनी धीरेंद्र शास्त्री बागेश्वर महाराज यांनी संत तुकाराम महाराजांच्या संदर्भात केलेल्या वक्तव्याचा तीव्र शब्दात निषेध केला. बागेश्वर महाराज किशोरवयीन असले तरीही त्यांच्या चुकीला माफी नाही.
राज्य सरकारने बागेश्वर महाराजांना महाराष्ट्रात बंदी घालावी. अन्यथा त्यांचा महाराष्ट्रात एकही कार्यक्रम होऊ देणार नाही, असा इशारा आझाद हिंद वारकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष अॅड. सतीशचंद्र रोठे यांनी दिला आहे.