चंद्रपूर : ब्रम्हपुरी तालुक्यातील हळदा गावात वाघाची दहशत कायम आहे. सोमवारला गावातील एका व्यक्तीला वाघाने भक्ष्य केले. या घटनेला काही तास उलटले असताना आज पुन्हा वाघाचा हल्यात गावातील देविदास कामडी (Devidas Kamadi) यांच्या मृत्यू झाला. दरम्यान वाघाला जेरबंद करण्याची मागणी गावकऱ्यांनी लावून धरली. सोमवारलाच वनविभागाने वाघाला जेरबंद करण्याचा प्रस्ताव प्रधान मुख्य वनसंरक्षकांना पाठविला आहे. ब्रम्हपुरी तालुक्यातील हळदा येथील जंगलात सोमवारला राजेंद्र कामडी ( वय 48) याला वाघाने ठार केले होते. या घटनेला काही तास उलटले असतानाच आज गावातील देविदास कामडी याचा वाघाचा हल्यात मृत्यू झाला. यापूर्वी मार्च महिन्यात बोडधा व एप्रिल महिन्यात आवळगाव येथील दोन नागरिकांना वाघाच्या हल्ल्यात प्राण गमवावा लागला होता. या घटनांनी गावकरी दहशतीत आहेत. यामुळे नरभक्षक वाघाचा तातडीने बंदोबस्त (Arrangement) करा, अशी संतप्त मागणी (Demand) नागरिकांनी केली.
या पार्श्वभूमीवर चंद्रपूर मुख्य वनसंरक्षक प्रकाश लोणकर यांनी सोमवारला या वाघाला पकडण्यासाठी मंजुरी मागणारा प्रस्ताव पाठवला. हा प्रस्ताव पाठवला जात असला तरी, नेमक्या कोणत्या वाघाने लोकांना मारले. त्याचे छायाचित्र किंवा निश्चित माहिती वन विभागाकडे सध्या तरी नाही. त्यामुळे या परिसरातील वाघांवर आम्ही लक्ष ठेवून आहोत, अशी माहिती लोणकर यांनी दिली. वाघ जेरबंद होईपर्यंत पुन्हा किती जणांचा बळी जाईल, असा प्रश्न गावकरी उपस्थित करीत आहेत.
चंद्रपूर जिल्ह्यात वाघाच्या हल्ल्यात एक मृत्यू झाला. ब्रह्मपुरी तालुक्यातील हळदा गावातील ही घटना आहे. गावातील राजेंद्र कामडी घराशेजारील जंगलात कुंपणासाठी काड्या आणण्यासाठी गेला असताना ही घटना घडली. जंगलात दबा धरून असलेल्या वाघाने राजेंद्र कांबळे यांच्यावर हल्ला करून ठार केले. वनविभागाच्या पथकाने प्राथमिक पंचनामा व तपास करून शव नातेवाईकांच्या स्वाधीन केले. राजेंद्र कामडी यांच्या पश्चात दोन मुले- पत्नी -आई व मोठा आप्तपरिवार आहे. वनविभागाने वारसांना प्राथमिक मदत दिली. पण, जीव परत येऊ शकत नाही. ही घटना ताजी असताना दुसरा बळी वाघाने घेतला. जंगलात गेलेल्या देविदास कामडी यांच्यावर वाघाने हल्ला केला. या घटनांमुळ हळदा गावातील नागरिक भयभीत झाले आहेत. घराबाहेर कसे पडावे, असा प्रश्न त्यांना पडला आहे. घरी राहून कामं होणार नाही. घरी बसून पोट भरणार नाही. कामानिमित्त घराबाहेर पडावेच लागेल.