नांदेड : नांदेड महानगरपालिकेत सत्ताधारी नगरसेवकांची मनमानी पाहायला मिळालीय. राज्य सरकारने नांदेड पालिका आयुक्त पदावर आयएएस अधिकारी निलेश गटणे यांची नियुक्त केली. मात्र, स्थानिक नगरसेवकांनी आयएएस अधिकाऱ्याच्या नियुक्तीला जोरदार विरोध केला. अखेर सरकारने ही नियुक्ती रद्द करत निलेश गटणे यांची औरंगाबाद जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी पदावर बदली केलीय. यामुळे नगरसेवकांमध्ये आनंदाचं वातावरण आहे, मात्र, सर्वसामान्य नांदेडकरांकडून नाराजी व्यक्त होत आहे.
नांदेडच्या नगरसेवकांनी आयएएस अधिकारी नको अशी मोहिमच सुरू केली होती. त्याला आता यश आलं. सरकारने नगरसेवकांच्या दबावासमोर झुकत नांदेड पालिकेवर आयएएस अधिकाऱ्याची नियुक्त रद्द केली. आयएएस अधिकारी नको अशी भूमिका घेत नांदेडच्या नगरसेवकांनी थेट नांदेडच्या पालकमंत्र्यांनाही गळ घातली. याला अखेर यश आलं.
आता नांदेड मनपा आयुक्तपदी सुनील लहाने हेच आयुक्त म्हणून कायम राहणार आहेत. नगरसेवकांनी आयएएस अधिकारी नको अशी भूमिका घेतल्याने शहरात सत्ताधाऱ्यांची मनमानी पाहायला मिळाली. सर्वसामान्य नांदेडकर मात्र या प्रकारावर नाराजी व्यक्त करतायत.
दरम्यान, स्थानिक नगरसेवकांना आयएएस अधिकारी आयुक्तपदी नकोय. त्यामुळे या नगरसेवकांनी पालकमंत्री चव्हाण यांच्याकडे लहाने यांना कायम ठेवण्याचा आग्रह केलाय. त्यामुळे गटणे यांच्या नावाची घोषणा हवेत विरण्याची चिन्हे निर्माण झालीयत.