अमरावती : काही लोक सभा घेत आहेत. वज्रमूठ दाखवत आहेत. त्यांच्या वज्रमूठीचा फोटो पाहा. त्याला भेगा पडलेल्या आहेत. भेगा पडलेली त्यांची वज्रमूठ आहे. आपल्या समोर त्याची वज्रमूठ चालू शकत नाही. आपली मूठ सशक्त आहे. अतिशय वैफल्यग्रस्त विरोधी पक्ष मी कधीच पाहला नाही, अशी टीका उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली होती. ठाकरे गटाचे खासदार अरविंद सावंत यांनी फडणवीस यांच्या टीकेचा खरपूस समाचार घेतला आहे. आमच्या वज्रमूठ सभेचा धसका त्यांनी घेतला आहे. ठोसा पडेल तेव्हा दातखिळी बसेल, अशा शब्दात अरविंद सावंत यांनी टीका केली आहे. अरविंद सावंत हे अमरावतीला आले होते. त्यावेळी त्यांनी मीडियाशी संवाद साधला.
महाविकास आघाडी एकत्र येऊ नये म्हणून संभाजीनगरमध्ये दंगल घडवण्यात आली. नागपूरमधल्या वज्रमूठ सभेच्या भेगा कोणाला पडल्या या दिसतच आहेत. सभाच होऊ नये असा प्रयत्न केला जातोय. वज्रमुठीचा धसका त्यांनी घेतलेला आहे. वज्रमूठीचा ठोसा बसेल तेव्हा दातखिळी बसलेली असेल, असा टोला अरविंद सावंत यांनी लगावला.
सगळ्यांनी संविधानाच्या रक्षणासाठी एकत्र आल पाहिजे ही भूमिका उद्धव ठाकरे यांची आहे. म्हणून ते असं म्हणतात की 2024 ची निवडणुकी शेवटची ठरेल. विभागल्या गेलेल्या मराठी माणसांनी एकत्र येण्याचा विचार केला पाहिजे, असं ते म्हणाले. राहुल गांधी यांनी भारत जोडो यात्रा काढली. ते जोडो महत्त्वाचा आहे, त्यामध्ये सर्व पक्षांना जोडणे हे महत्त्वाच आहे. त्यामुळे भेटीगाठी होत असतात त्याचं स्वागत केलं पाहिजे. जोडो मधला तो धागा आहे ते ओवण्याचे काम जर कोणी करत असेल त्याचा आनंद आहे. राहुल गांधी मातोश्रीवर येत असेल तर त्यांचं स्वागतच आहे. मातोश्री नेहमी उदारच राहिली आहे, असं त्यांनी सांगितलं.
येत्या 16 एप्रिल रोजी महाविकास आघाडीच वज्रमूठ सभा नागपूर येथे होणार आहे. या सभेची महाविकास आघाडीने जय्यत तयारी सुरू केली आहे. या सभेला माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, राष्ट्रवादीचे नेते अजित पवार, काँग्रेस नेते अशोक चव्हाण, विजय वडेट्टीवार, ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत आणि राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील आदी नेते उपस्थित राहणार आहे. या सभेला अद्याप परवानगी मिळाल नाही. मैदानाचा वाद कोर्टात गेला आहे. त्यामुळे कोर्ट काय निर्णय देते याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.