सांगली : सांगलीत एका महिला अधिकाऱ्यावर हल्ला (Attack) झाल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. अज्ञाताने चाकूने हल्ला करत उपजिल्हाधिकारी यांना जखमी केले आहे. हर्षलता गेडाम (Harshalata Gedam) असे जखमी महिला उपजिल्हाधिकारीचे नाव आहे. पहाटे जॉगिंगसाठी गेल्या असताना हा प्राणघातक हल्ला करण्यात आला आहे. सुदैवाने यात गेडाम यांना मोठी इजा झाली नाही. हाताला किरकोळ जखम (Injured) झाली आहे. या प्रकरणी विश्रामबाग पोलिस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. उपजिल्हाधिकारी महिला अधिकाऱ्यावर झालेल्या हल्ल्याच्या घटनेमुळे सांगलीत खळबळ उडाली आहे. याआधीही आरोपीपैकी एकाने हर्षलता यांच्याशी छेडछाड केली होती.
गेडाम या सकाळी नेहमीप्रमाणे जॉगिंगसाठी विश्रामबागच्या नेमिनाथनगर येथील कल्पद्रुम क्रीडांगणावर गेल्या होत्या. जॉगिंग सुरू असताना मोटारसायकालवरून आलेल्या अज्ञात दोघांनी छेडछाड करत उपजिल्हाधिकारी यांच्या दंडाला हात लावून ओढत “चालतेस का”? असं विचारले. त्यानंतर हात लावणाऱ्या अज्ञाताला गेडाम यांनी लाथ मारून खाली पाडले. या झटापटीत दुसऱ्या अज्ञात व्यक्तीने चाकूने गेडाम यांच्यावर हल्ला केला. या हल्ल्यात गेडाम यांच्या हाताला किरकोळ जखम झाली आहे. त्यानंतर मार्शल आर्ट असणाऱ्या गेडाम यांनी स्वतःचा बचाव करण्यासाठी प्रतिहल्ला केल्यानंतर दोघांनी त्या ठिकाणाहून पळ काढला. सदरच्या अज्ञाता पैकी एकाने 17 मे रोजी गेडाम यांचा पाठलाग करत छेडछाड करण्याचा प्रकार केला होता. मात्र त्यावेळी त्यांनी दुर्लक्ष केलं होतं. आज तीच व्यक्ती पहाटेच्या सुमारास पुन्हा आली आणि त्याने गेडाम यांच्यावर हल्ला केला आहे. याबाबत उपजिल्हाधिकारी हर्षलता गेडाम यांनी विश्रामबाग पोलिस ठाण्यामध्ये धाव घेत अज्ञातांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. (Attack on a Deputy Collector female officer who went for a morning jogging Sangli)