बदलापूर बाललैंगिक अत्याचार प्रकरणात मोठी अपडेट समोर आली आहे. या प्रकरणाकील आरोपी अक्षय शिंदेच्या पोलीस कोठडीत वाढ झाली आहे. विशेष न्यायालयाने तीन दिवसांची पोलीस कोठडी मंजूर केली आहे. एसआयटीने न्यायालयात दंडाधिकारी समोर असा दावा केला की, आरोपीने आपला मोबाईल फोन लपवला आहे. जो या प्रकरणाच्या पुढील तपासासाठी अत्यंत महत्त्वाचा ठरू शकतो. त्यामुळे आरोपीने इतर मुलींवरही अत्याचार केले आहेत का? याचा तपास करण्यासाठी आणि पुरावे गोळा करण्यासाठी पोलीस कोठडीची आवश्यकता आहे, असं एसआयटीने न्यायालयात म्हटलं. या मागणीला आरोपीच्या वकिलाने विरोध केला. मात्र, न्यायालयाने विरोध बाजूला ठेवत तीन दिवसांची पोलीस कोठडी मंजूर केली. त्यानंतर अक्षयची पोलीस कोठडी वाढवण्यात आली आहे.
बदलापूरमधील दोन 4 वर्षीय मुलींच्या लैंगिक अत्याचार प्रकरणात अटक करण्यात आलेल्या अक्षय शिंदेच्या मोबाईलचा तपास करण्यासाठी विशेष तपास पथकाने एसआयटी पुन्हा त्याची तीन दिवसांची पोलीस कोठडी घेतली आहे. विशेष पोक्सो न्यायालयाने मंगळवारी ही कोठडी मंजूर केली. अक्षय शिंदे हा बदलापूर पूर्वेतील एका शाळेत सफाई कर्मचारी म्हणून कार्यरत होता, जिथे त्याने दोन मुलींवर अत्याचार केल्याचा आरोप आहे.
बदलापूर मधील एका प्रतिष्ठित शाळेत दोन लहान मुलींवरील लैंगिक अत्याचाराचं प्रकरण समोर आलं. अवघ्या साडेतीन वर्षाच्या दोन मुलींवर शाळेतील स्वच्छता कर्मचाऱ्याने लैंगिक अत्याचार केल्याचं समोर आलं. त्यानंतर नागरिक संतप्त झाले. या प्रकरणामुळे परिसरात मोठा तणाव निर्माण झाला होता. रस्त्यावर उतरत बदलापूरकरांनी या घटनेचा निषेध केला होता. घटनेवर सर्वच स्तरातून संताप व्यक्त करण्यात आला. आरोपीला तात्काळ फाशी देण्याची मागणी करण्यात आली.
नागरिकांच्या विरोधामुळे रेल्वे मार्गही 9 तासांपर्यंत रोखला गेला होता. या आंदोलनाचे राज्यभर पडसाद उमटले होते. या आंदोलनात सहभागी झालेल्या आंदोलकांवर गुन्हे दाखल करण्यात आले. या105 आंदोलकांना कल्याण न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे.