बारामती: बारामतीच्या जनतेने पवार घराण्याच्या गुलामगिरीतून मुक्त व्हावे, असे आवाहन भाजप आमदार गोपीचंद पडळकर (Gopichand Padalkar) यांनी केले. पवारांच्या नेतृत्वाखालील महाविकासआघाडी सरकार फुले- शाहू-आंबेडकर यांच्या खऱ्या वारसदारांच्या संविधानिक हक्कांवर गदा आणण्याचे व त्यांचा गळा घोटण्याचे महापाप करत असल्याचेही पडळकर यांनी म्हटले. (BJP Leader Gopichand Padalkar take a dig on Sharad Pawar and his family)
ते शनिवारी बारामती येथे प्रसारमाध्यमांशी बोलत होते. पड़ळकर आज बारामतीच्या दौऱ्यावर असून बारामतीच्या विविध भागात वंजारी,तेली, शिंपी, माळी, रामोशी समाजाच्या घोंगड्या बैठका घेत आहेत. यावेळी त्यांनी बारामतीच्या जनतेला पवारांच्या गुलामगिरीतून मुक्त होण्याचे आवाहन केले. गोपीचंद पडळकर यांनी पवारांच्या बालेकिल्ल्यातूनच त्यांच्यावर तोफ डागल्याने आता राष्ट्रवादीचे नेते काय प्रत्युत्तर देणार, याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.
दरम्यान, या टीकेला उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुण्यात प्रसारमाध्यमांशी बोलताना प्रत्युत्तर दिले. मी राज्याचा उपमुख्यमंत्री आहे. तुम्ही मला कोणाबद्दल विचारताय? बारामतीकरांनी ज्याचं डिपॉझिट जप्त केलं त्याच्याविषयी काय बोलायचं, अशी खोचक टिप्पणी अजित पवार यांनी केली.
पदोन्नतीतील आरक्षण रद्द करण्याच्या मुद्द्यावरुन मध्यंतरी गोपीचंद पडळकर यांनी अजित पवार यांना लक्ष्य केले होते. अजित पवार यांना मागासवर्गीय नोकरी पदोन्नती आरक्षण उपसमितीचे प्रमुख करणे म्हणजे मेंढरांनी लांडग्याकडून संरक्षणाची अपेक्षा करावी, असं होईल, असे पडळकर यांनी म्हटले होते.
संबंधित बातम्या:
पार्थ पवार पडला तेव्हा तुमची लायकी नव्हती का; गोपीचंद पडळकरांचा अजितदादांवर पलटवार
अजित पवार हसले, म्हणाले, प्रमुख पक्षाचं तिकीट घेऊनही पठ्ठ्याचं डिपॉझिट जप्त होतंय, कशाला नोंद घेताय!
(BJP Leader Gopichand Padalkar take a dig on Sharad Pawar and his family)