वर्धा : तुम्हाला प्रवासाला निघायचे आहे, त्यासाठी रेल्वे स्थानकही (Railway Station) गाठले असेल. रेल्वेची वाट पाहत उभे असताना चुकूनही रेल्वे पटरी (Railway tracks) ओलांडण्याचे धाडस करू नका. कारण, असाच प्रयत्न करणाऱ्या 9 जणांना आपल्या जिवाला मुकावे लागले आहे, तर अनेकांना अपंगत्वही आले आहे. तेव्हा वर्धेकरांनी रेल्वे रुळ ओलांडताना सावधानता बाळगण्याची गरज निर्माण झाली आहे. रेल्वेच्या धडकेत मागील वर्षभरात 9 जणांना आपला जीव गमवावा लागला आहे, तर काहींना कायमचे अपंगत्व आले आहे. एवढंच नव्हे तर रेल्वे सुरक्षा बलाच्या (Security Force) जवानांनी 2021 मध्ये रेल्वे रुळ ओलांडणाऱ्या 45 जणांवर कारवाई केली. त्यांच्याकडून 9 हजार 800 रुपयांचा दंड वसूल केला आहे.
रेल्वे सुरक्षा बलाकडून अभियान राबविण्यात येत आहे. स्थानक, फलाट आणि स्थानकांच्या शेजारी असलेल्या वसाहती, झोपडपट्ट्यांमध्ये जाऊन ट्रेस पासिंग न करण्याचा संदेश दिला जातो आहे. तसेच नागरिकांना पूल किंवा सब वेचा वापर करण्यासाठी जनजागृतीही केली जात आहे. पण, लक्षात घेतील ते प्रवासी कसले. काही प्रवासी याकडं दुर्लक्ष करतात. त्यामुळंच अपघात होतो.
रेल्वेचे सुरक्षा बल कारवाई करते. तरीही काही प्रवासी याला जुमानत नाही. गेल्या वर्षभरात नऊ जणांना आपले प्राण गमवावे लागले. तर काही जणांना अपंगत्व आले. त्यामुळं रेल्वे पुल क्रॉस करताना जरा जपून येवढचं. यानिमित्तानं सांगावसं वाटते.