बीड : बीड जिल्ह्यात कोरोनाचा (Beed Corona cases) प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढतच आहे. यात सरकारी आणि खासगी डॉक्टर जीव पणाला लावून रुग्णांवर उपचार करत आहेत . कोरोना पॉझिटिव्ह (Corona positive) आल्यानंतर अनेक लोक घाबरून जातात. गेवराई तालुक्यातील जातेगाव येथील एक सहा महिन्यांची गर्भवती महिला पॉझिटिव्ह आली. आता पुढे काय होईल या भीतीपोटी ही महिला काकुळतीला आली. डॉक्टरांकडे गेल्यानंतर या महिलेने थेट हंबरडा फोडला. (Beed pregnant corona positive woman)
अशा कठीण प्रसंगातून तिला बाहेर काढण्यासाठी खासगी डॉक्टर जीवनकुमार राठोड यांनी ताई घाबरु नको काहीही होणार नाही असं म्हणत गर्भवती महिलेला भावाप्रमाणे समजावलं. एखाद्या भावाने आपल्या बहिणीला कवटाळावं, तसंच काहीसं चित्र, क्लिनीकमध्ये दिसलं.
डॉक्टर आणि पेशंटमध्ये तसं कोणतंही नातं असू नये म्हणतात. मात्र बीडमधील या डॉक्टरने दिलेल्या दिलास्याच्या शब्दांनी, खचलेल्या गर्भवतीला नवी ताकद आणि नवी उमेद दिली. सध्याच्या कठीण काळात डॉक्टरांनी रुग्णांच्या सेवेसाठी अक्षरश: जीव पणाला लावला आहे. रुग्णांची संख्या आणि साखळी दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे डॉक्टरांना एका एका रुग्णाला शक्य तितक्या कमी वेळेत तपासून उपचार करावे लागतात. अशा वेळी डॉक्टर जीवनकुमार राठोड यांनी दाखवलेल्या जिव्हाळ्याचं सर्वत्र कौतुक होत आहे.
राठोड यांच्या क्लिनीकमधील सीसीटीव्हीतील हे जिव्हाळ्याचं चित्र बीडमध्ये चर्चेत आहे. डॉक्टर आणि पेशंटमधील माणुसकीचं दर्शन व्हायरल होत आहे.
कोरोना पॉझिटिव्ह व्यक्तीच्या संपर्कात येणे, त्यांच्या जवळ जाणे हे तितकेच धोकादायक असले तरीही त्या कठीण प्रसंगात डॉक्टरांच्या धीराच्या दोन शब्दांनी गर्भवती महिलेला जगण्याची नवी उमेद दिली.
संबंधित बातम्या
धक्कादायक! रुग्णाचा मृत्यू झाल्यानंतर कर्मचाऱ्यांनी खिशातून 35 हजार रुपये चोरले
IPL 2021 : गेल डिव्हिलियर्सला विसराल, विराट कोहलीविरुद्ध पदार्पण करणार हे 100 नंबरी सोनं!