सांगली : महापुरात शेतीचे झालेले नुकसान आणि जनावरांचे झालेले हाल सहन न झाल्याने नागठाणे ता. पलूस येथील एका तरुण शेतकऱ्याने गळफास घेऊन आपली जीवनयात्रा संपवली. या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे. नागठाणे येथील गणेशनगर भागात बुधवारी ही घटना घडली.
निलेश बाळकृष्ण पवार (वय 22) असं या आत्महत्या केलेल्या तरुण शेतकऱ्याचं नाव आहे. भिलवडी पोलिसांत घटनेची नोंद झाली आहे. महापुरात शेतीचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं. आता इथून पुढचं जीवन कठीण आहे, अशी सल मनात ठेऊन तरुणाने आत्महत्येसारखं टोकाचं पाऊल उचललं.
कृष्णा नदीला मागील आठवड्यात महापूर आला आणि या महापुरात निलेशच्या ऊसाच्या शेतीचं आणि जनावरांच्या गोट्याचं फार मोठे नुकसान झाले होते. त्यामुळे तो फार नैराश्यात होता. बुधवारी तो जनावरांचा गोठा साफसफाई करण्यासाठी गेला होता. मात्र तो घरी परत न आल्याने नातेवाईकांनी शोध घेतला. काही वेळाने निलेशने याच शेडमध्ये गळफास लावून घेतल्याचे निदर्शनास आले. याप्रकरणी निलेशचे वडील बाळकृष्ण दशरथ पवार यांनी पोलिसांत फिर्याद दिली आहे.
निलेशच्या घरात आई वडील लहान भाऊ बहीण चुलते असे मिळून 10 जणांचे मोठं कुटुंब आहे. घरची परिस्थिती फारच गरिबीची आणि हालखीची आहे. लॉकडाऊनच्या काळात निलेशचे वडील गावोगाव फिरुन भाजीपाला विकण्याचे काम करीत होते. जनावरे आणि शेतीवरच या कुटुंबातील सर्वच उदरनिर्वाह करत होते आणि पोट भरत होते. या कुटुंबावर महापूर आल्यामुळे ऊसशेतीचे फार मोठे नुकसान झाले. आकाशवर आभाळ कोसळले होते. पण सरकारकडून काहीच मदत मिळाली नाही. त्यामुळे निलेश फार निराश होता. शेवटी आत्महत्येसारखं टोकाचं पाऊल उचलत त्याने आपली जीवनयात्रा संपवली.
या अल्पभूधारक शेतकरी कुटुंबातील घरातील कर्ता मुलगा गेल्याने कुटूंबाला मोठा धक्का बसला आहे. संपूर्ण गावावर या घटनेने शोककळा पसरली आहे. कुटुंबाचा आक्रोश हृदय पिळवून टाकणारा होता. अधिक तपास सहायक पोलिस निरीक्षक कोडग यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस कर्मचारी चव्हाण आणि पागे करीत आहेत.
(Big Loss Agriculture And livestock Due to maharashtra Flood 22 year Old Farmer Commits Suicide)
हे ही वाचा :
VIDEO | बर्थडे सेलिब्रेशनच्या नावाखाली 33 केकची नासाडी, मुंबईतील टोळक्याची हुल्लडबाजी
पोलिसांच्या मारहाणीनंतर नागपुरात तरुणाची आत्महत्या, गुन्हे शाखेमार्फत सखोल चौकशी