अमरावती : महाराष्ट्रातील राजकारण ढवळून निघणारी एक महत्त्वाची बातमी आहे. अनेकांच्या भुवया उंचवायला लावणारी ही बातमी आहे. काँग्रेस आणि भाजपच्या संबंधातील ही बातमी आहे. दोन्ही पक्ष एकमेकांचे हाडवैरी. पारंपारिक शत्रू. एकमेकांना पाहण्यात पाहणारे. भाजपने तर देशाला काँग्रेसमुक्त करण्याचा विडाच उचलला आहे. त्यावरून दोन्ही पक्षात किती विस्तव जात असेल याचा अंदाज येईल. भाजपला पराभूत करणं हे काँग्रेसचं एकमेव लक्ष आहे. तर काँग्रेसला हद्दपार करणं हे भाजपचं टार्गेट आहे. पण भाजपच काँग्रेसला बळ देत असल्याचं सांगितलं तर? भाजपने काँग्रेससोबत युती केली असं सांगितलं तर? विश्वास बसणार नाही ना? पण हे घडलंय. अमरावतीतच हे घडलं आहे. खुद्द भाजपचे खासदार अनिल बोंडे यांच्या आशीर्वादानेच हे घडलं आहे.
अमरावतीच्या वरुड बाजार समितीत भाजपची कट्टर विरोधी पक्ष असलेल्या काँग्रेससोबत युती झाली आहे. भाजप खासदार अनिल बोंडे यांनी ही युती घडवून आणली आहे. काँग्रेसच्या नरेशचंद्र ठाकरे यांच्या बाजून अनिल बोंडे लढणार आहेत. भाजपचे खासदार अनिल बोंडे वारंवार काँग्रेसवर टीका करत असतात. राहुल गांधी यांच्यावर ते संधी मिळेल तेव्हा तोंडसुख घेत असतात. तसेच महाविकास आघाडीची युती ही अभद्र युती असल्याचं सांगत असतात. मात्र, वरुडच्या बाजार समितीत सत्तेचा खेळ जुळेनासा झाला तेव्हा बोंडे यांनी थेट काँग्रेसच्या एका गटासोबत हातमिळवणी केल्याने आश्चर्य व्यक्त केलं जात आहे. अनिल बोंडे यांच्या या निर्णयाने अमरावतीचं संपूर्ण राजकारणच ढवळून निघालं आहे. तसेच बोंडे यांच्या या कृतीचे अनेक राजकीय संकेत काढले जात आहेत.
एकीकडे काँग्रेससोबत युती केल्याने अनिल बोंडे खूश आहेत. तर या नव्या घरोब्यावर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी प्रचंड नाराजी व्यक्त केली असल्याचं सूत्रांनी सांगितलं. स्थानिक काँग्रेसने हा निर्णय घेण्याची गरज नव्हती, असं काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्यांचं म्हणणं आहे. तर भाजप आणि काँग्रेसची युती ही अभद्र युती असल्याची जोरदार चर्चा जिल्ह्यात सुरू आहे.
वरूड बाजार समितीत काँग्रेस आणि राष्ट्रवादीची सत्ता राहिलेली आहे. गेल्या दहा र्षापासून काँग्रेसचीच वरूड बाजार समितीत सत्ता होती. त्या आधी राष्ट्रवादीच्या हर्षवर्धन देशमुख गटाचीही सत्ता होती. तर काँग्रेसचे नरेशचंद्र ठाकरे यांनीही बाजार समितीत दहा वर्ष सत्ता उपभोगली आहे.
वरुड बाजार समितीचं चित्रं 20 एप्रिलनंतर चित्र स्पष्ट होणार आहे. 30 एप्रिल रोजी या निवडणुकीसाठी मतदान होणार आहे. बाजार समितीच्या 18 संचालकपदासाठी निवडणूक होत आहे. या निवडणुकीत 54 उमेदवार उभे आहेत. ही निवडणूक सर्वच राजकीय पक्षांनी प्रतिष्ठेची केली आहे. या निवडणुकीत काँग्रेस पक्ष दोन गटात विभागला गेला आहे. भाजपमध्येही गटबाजी झाली आहे. काँग्रेसच्या नरेशचंद्र ठाकरे गटासोबत अनिल बोंडे यांनी युती केली आहे. बोंडे हे ठाकरे यांच्या बाजूने प्रचार करणार आहेत. तर काँग्रेसच्या गिरीश कराळे गटाने राष्ट्रवादीच्या हर्षवर्धन देशमुख गटाशी युती केली आहे.