अमरावती : राष्ट्रवादीचे नेते अजित पवार हे भाजपसोबत जाणार असल्याच्या वावड्या गेल्या आठवड्यात उठल्या होत्या. अजित पवार हे भाजपसोबत सत्ता स्थापन करणार आहेत. त्यांच्यासोबत 40 आमदार असल्याचंही सागितलं जात होतं. स्वत: अजित पवार यांनी मीडियासमोर येऊन या चर्चांमध्ये काहीच तथ्य नसल्याचं स्पष्ट केलं. मी शेवटच्या श्वासापर्यंत राष्ट्रवादीतच राहणार असल्याचंही अजितदादांनी स्पष्ट केलं. त्यानंतर या चर्चांना पूर्णविराम मिळाला. मात्र, या चर्चा पूर्णपणे थांबलेल्या नाहीत. आता भाजपच्या एका खासदाराने एक मोठं विधान केलं आहे. शरद पवार यांच्या सांगण्यावरूनच संजय राऊत हे अजित पवार यांना महाविकास आघाडीतून बाहेर काढतील, असा दावा या भाजप खासदाराने केला आहे. त्यामुळे खळबळ उडाली आहे.
भाजपचे खासदार अनिल बोंडे यांनी मीडियाशी संवाद साधताना हा खळबळजनक दावा केला आहे. संजय राऊत यांच्या म्हणण्यानुसार ते शरद पवार यांच्या सांगण्यावरूनच अजित पवार यांना महाविकास आघाडीमधून बाहेर काढतील. शिवसेनेतील 40 आमदार संजय राऊत यांना कंटाळून गेले. अजितदादा पवार हे सुद्धा संजय राऊत यांना कंटाळूनच महाविकास आघाडी सोडून जातील. महाविकास आघाडी फुटण्यास संजय राऊतच जबाबदार राहतील. तशी त्यांची थोरवी मोठी आहे. शिवसेना फोडण्यातही त्यांचाच मोठा वाटा आहे. राऊतांनीच 40 आमदारांना घराच्या बाहेर काढलं, असं विधान अनिल बोंडे यांनी केलं आहे. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे.
दरम्यान, घाटकोपर येथे एनसीपी कार्यकर्त्यांची बैठक पार पडणार आहे. या बैठकीला पक्षाचे कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांना बोलावण्यात आलं आहे. या बैठकीला राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार संबोधित करणार आहेत. याप्रसंगी राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, खासदार प्रफुल्ल पटेल, छगन भुजबळ, अनिल देशमुख आणि आदिती तटकरे उपस्थित राहणार आहेत. मात्र कार्यक्रमाला हजर राहणाऱ्या नेत्यांच्या यादीत अजित पवार यांचं नाव नाही. त्यामुळे आश्चर्य व्यक्त केलं जात आहे. अजित पवार पुण्यात असल्याने त्यांचं नाव कार्यक्रमाच्या यादीत नसल्याचं सांगितलं जात आहे.
राष्ट्रवादीच्या मुंबईतील कार्यक्रमातून मला साईडलाईन करण्यात आल्याच्या चर्चांमध्ये तथ्य नाही. माझे कार्यक्रम पूर्वनियोजित होते. संध्याकाळी पुण्यात माझी मुलाखत आहे. तीही पूर्वनियोजित होती. त्यामुळे मी घाटकोपर येथे होणाऱ्या अधिवेशनाला जाऊ शकणार नाही, असं अजित पवार यांनी स्पष्ट केलं. महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हा कार्यक्रम होणार आहे.