सिंधुदुर्ग: शिवसेना आणि भाजप यांच्यात सिंधुदुर्गात झालेल्या राड्यानंतर कोकणातील राजकीय वातावरण प्रचंड तापले आहे. माजी आमदार आणि भाजपचे जिल्हाध्यक्ष राजन तेली यांनी शिवसेना आमदार वैभव नाईक (Vaibhav Naik) यांच्यावर गुन्हा दाखल झाला पाहिजे, अशी मागणी केली आहे. अन्यथा भाजप आपल्या स्टाईलने त्यांना उत्तर देईल, असा इशारा राजन तेली यांनी दिला. (BJP leader Rajan Teli take a dig at Shivsena)
ते शनिवारी सिंधुदुर्गात प्रसारमाध्यमांशी बोलत होते. यावेळी त्यांनी वैभव नाईक यांनी जमावबंदीच्या नियमाचे उल्लंघन केल्याप्रकरणी त्यांच्यावर 353 चा गुन्हा दाखल करण्याची मागणी केली. वैभव नाईक व त्यांच्या सत्ताधारी लोकांनी आत्मपरीक्षण करायला हवं. आपला जिल्हा रेड झोनमध्ये आहे, पॉझिटिव्हीटी रेट कमी दाखवून गोष्टी दडवल्या जात आहेत. या सगळ्या गोष्टींवर त्यांनी काहीतरी करायला हवं होतं. जिल्ह्यात 950 लोक कोरोनाने गेलेत, त्याला जबाबदार कोण? त्याची जबाबदारी वैभव नाईक व पालकमंत्री घेणार आहेत का? लोकांना सांगता आहेत कोरोना वाढतोय गर्दी करू नका मग यांना मुभा दिली आहे की लायसन दिलं आहे, असे अनेक सवाल राजन तेली यांनी उपस्थित केले. पोलिसांनी वैभव नाईक यांच्यावर कारवाई केली नाही तर भाजपा आपल्या पद्धतीने करेल. पोलिसांच्या विरोधात भूमिका घ्यावी लागेल, असेही राजन तेली यांनी म्हटले.
शिवसेना आणि भाजप कार्यकर्त्यांमध्ये सिंधुदुर्गात झालेल्या राड्यानंतर नारायण राणे यांचे सुपूत्र आणि भाजप आमदार नितेश राणे हे प्रचंड आक्रमक झाले आहेत. त्यांनी ट्विट करुन शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांना इशारा दिला आहे. ‘शिवप्रसाद’ काय असतो, ते संजय राऊतांनी आमदार वैभव नाईक यांना विचारावे. आमच्या कार्यकर्त्यांनी त्यांना पोटभर ‘प्रसाद’ दिला आहे. पाहिजे असेल तर तुमच्यासाठी मी सामना ऑफिसमध्ये पार्सल घेऊन येतो. टेस्ट आवडेल नक्की, असे नितेश राणे यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे. त्यामुळे आता संजय राऊत यावर काय प्रत्युत्तर देणार, याकडे सगळ्यांच्या नजरा लागल्या आहेत.
संबंधित बातम्या:
…तर ‘सामना’च्या ऑफिसमध्ये येऊन ‘प्रसाद’ देईन; नितेश राणेंचा संजय राऊतांना इशारा
शिवसेना भवनानंतर कोकणातही राडा, आमदार वैभव नाईक राणेंच्या पेट्रोल पंपावर, सेना-भाजप धुमश्चक्री
नारायण राणेंच्या पेट्रोल पंपावर शिवसेनेचा राडा; निलेश राणे संतापाच्या भरात म्हणाले…
(BJP leader Rajan Teli take a dig at Shivsena)