अहमदनगर : भाजप प्रदेश उपाध्यक्ष राम शिंदे यांनी परळीत करुणा शर्मा यांच्यावर दाखल करण्यात आलेले गुन्हे आणि अटकेवरून सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर जोरदार टीका केलीय. परळीत आलेल्या करुणा शर्मा यांच्याबाबतीत जे काही घडले त्यावरून त्यांच्याविरूद्ध कटकारस्थान रचल्याचे दिसून येत आहे, असा गंभीर आरोप राम शिंदे यांनी केलाय. अशा प्रकारे राज्यातील एखाद्या मंत्र्याकडूनच कोणावर अन्याय करण्याची भूमिका दिसून येत असेल तर त्याची सखोल चौकशी झाली पाहिजे, अशी मागणी राम शिंदे यांनी केलीये. तसेच प्रसारमाध्यमांमधून घटनेच्यावेळचे व्हिडिओ समोर आले आहेत, त्यावरून हे मोठे कारस्थान असल्याचे दिसतं, असंही त्यांनी म्हटलं.
राम शिंदे म्हणाले, “भारतात सर्वांना स्वातंत्र्य आहे. स्वतःचे मत मांडण्याचं स्वातंत्र्य आहे, अस असताना परळीत जे घडलं आणि सोशल मीडियावर जे पाहायला मिळालं ते चुकीचं आहे. याची सखोल चौकशी झाली पाहिजे. जे सत्य आहे ते समोर यायला हवं. शेवटी कुणाला अडवून, कुणाला दडवून काम होणार नाही. परंतु राज्यातील एखाद्या मंत्र्यानं अशा अन्याय आणि अत्याचाराची भूमिका घेतली तर त्याची सखोल चौकशी होण्याची गरज आहे.”
VIDEO: परळीत करुणा शर्मांबाबत घडलेला प्रकार कटकारस्थान, राम शिंदेंचा धनंजय मुंडेंवर घणाघाती आरोप@RamShindeMLA @BJP4Maharashtra #DhananjayMunde #RamShinde #KarunaSharma #NCP #BJP #Beed #Parali pic.twitter.com/u8kLOq7LOv
— Pravin Sindhu | प्रविण सिंधू ??✊ (@PravinSindhu) September 7, 2021
“हा कट आहे. इतक्या मोठ्या गर्दीत एक माणूस चालू गाडीची डिक्की उघडतो. त्याच्या हातातील वस्तू ठेवतो, दुसऱ्या बाजूचा माणूस डिक्की बंद करतो. त्यासाठी पोलीस त्याच्या शेजारी उभा असतो. या परिस्थितीची सखोल चौकशी व्हायला पाहिजे. यात मोठं कटकारस्थान आहे. त्यामुळे याची चौकशी होऊन सत्य जगासमोर आलं पाहिजे. कुणावरही अन्याय होऊ नये. शेवटी हे राज्य कायद्याचं आहे. मंत्र्यांनी जी शपथ घेतली आहे त्याप्रमाणे वागून न्याय झाला पाहिजे,” असंही राम शिंदे यांनी नमूद केलं.
राम शिंदे यांनी यावेळी ईडीच्या चौकशीवरून माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांचाही समाचार घेतला. राज्यातील कायदा आणि सुव्यवस्था ढासळली आहे. केंद्रीय मंत्र्यांना आपण अटक करतो, मात्र माजी गृहमंत्री सापडत नाही, असा टोला त्यांनी लगावलाय. खरंतर माजी गृहमंत्र्यांनी स्वतःहून चौकशीसाठी हजर झालं पाहिजे, असं मत शिंदे यांनी व्यक्त केलं. कदाचित त्यांना काठीची भीती वाटत असेल, असा टोलाही राम शिंदे यांनी देशमुखांना लगावला.