बीड : बीड जिल्ह्यातील परळी, अंबाजोगाई, गेवराई, बीड, वडवणी, आष्टी बाजार समितीचे निकाल आले आहेत. या निवडणुकीत भाजपचा सुपडा साफ झाला आहे. तर राष्ट्रवादीने आपलं वर्चस्व प्रस्थापित केलं आहे. अंबाजोगाई आणि परळीत पंकजा मुंडे यांना मोठा पराभव स्वीकारावा लागला आहे. या ठिकाणी धनंजय मुंडे यांनी आपलं वर्चस्व प्रस्थापित केलं आहे. त्यामुळे बहीण हरली आणि भाऊ जिंकला अशी चर्चा या मतदारसंघात सुरू झाली आहे. तर इतर बीड जिल्ह्यातील इतर बाजार समित्यातही राष्ट्रवादीनेच मुसंडी मारली आहे. बीड जिल्ह्यात प्रीतम मुंडे या भाजपच्या खासदार आहेत. तर पंकजा मुंडे यांचं मोठं वर्चस्व आहे. तरीही राष्ट्रवादीने भाजपचा करेक्ट कार्यक्रम केल्याची जोरदार चर्चा आहे.
अंबाजोगाई कृषी उत्पन्न बाजार समितीत धनंजय मुंडे यांच्या नेतृत्वात योगेश्वरी शेतकरी विकास पॅनलने निवडणूक लढवली. या पॅनलला 18 पैकी 15 जागा मिळाल्या आहेत. तर परळी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत धनंजय मुंडे यांनी सर्वच्या सर्व 18 जागा जिंकल्या आहेत. परळीत पंकजा मुंडे यांना एकही उमेदवार निवडून आणता आला नाही. त्यामुळे पंकजा मुंडे यांच्यासाठी हा मोठा धक्का असल्याचं सांगितलं जात आहे.
गेवराईतही भाजपला मोठा धक्का बसला आहे. अमरसिंह पंडित यांच्या राष्ट्रवादीच्या पॅनलने गेवराईत 18 पैकी 18 जागा जिंकल्या आहेत. काही ठिकाणी तर विरोधकांचे डिपॉझिटही जप्त केले आहे. वडवणी बाजार समितीत आमदार प्रकाश सोळंके आणि माजी आमदार केशवराव आंधळे यांनी एकत्रित येऊन भाजपला टक्कर देत भाजपचा सुपडा साफ केला आहे. वडवणीतही राष्ट्रवादी आणि महाविकास आघाडीने मिळून 18 पैकी 18 जागा विजयी झाल्या आहेत.
बीड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत आमदार संदीप क्षीरसागर यांनी मोठा चमत्कार घडवला आहे. त्यांनी काका जयदत्त क्षीरसागर यांना धूळ चारली आहे. त्यांनी 18 पैकी 15 जागा निवडून आणल्या आहेत. बीडमध्ये जयदत्त क्षीरसागर यांची 35 वर्षांपासूनची सत्ता पालटण्यात संदीप क्षीरसागर यांना यश आलं आहे.
आष्टी बाजार समितीची निवडणूक याआधीच बिनविरोध झाली आहे. या समितीत सुरेश धस गटाचे 11, राष्ट्रवादीचे 3, भीमराव धोंडे गटाचे 3 तर शिंदे सेनेचा 1 उमेदवार विजयी झाला आहे. केज बाजार समितीच्या निवडणुकीत मात्र भाजपला 14 जागा मिळाल्या असून, जिल्ह्यातील केवळ एका विजयावर समाधान मानावे लागले आहे.