तोंडाला ऑक्सिजन, हाताला सलाईन, छातीला मार लागला; आमदार जयकुमार गोरे यांना पुण्यातील रुबी रुग्णालयात आणले

| Updated on: Dec 24, 2022 | 9:34 AM

जयकुमार गोरे यांची कार ज्या खड्ड्यात पडली होती, त्या खड्ड्यातून ही कार बाहेर काढण्यात आली. क्रेनने ही कार बाहेर काढण्यात आली. यावेळी बघ्यांची मोठी गर्दी झाली होती.

तोंडाला ऑक्सिजन, हाताला सलाईन, छातीला मार लागला; आमदार जयकुमार गोरे यांना पुण्यातील रुबी रुग्णालयात आणले
आमदार जयकुमार गोरे यांना पुण्यातील रुबी रुग्णालयात आणले
Image Credit source: tv9 marathi
Follow us on

संतोष नलावडे, टीव्ही9 मराठी प्रतिनिधी, पुणे: साताऱ्यातील फलटण येथे आज पहाटे झालेल्या भीषण पघातात भाजपचे आमदार जयकुमार गोरे जखमी झाले असून त्यांच्यासोबतचे तिघेजण गंभीर जखमी झाले आहेत. गोरे यांची कार 30 फूट खोल खड्ड्यात कोसळल्याने गोरे यांच्या छातीला मार लागला. गोरे यांच्यावर साताऱ्यातील रुग्णालयात उपचार केल्यानंतर त्यांना आता पुण्यातील रुबी रुग्णालयात आणण्यात आलं आहे. विशेष रुग्णवाहिकेतून त्यांना पुण्यात आणण्यात आलं असून त्यांना एमर्जन्सी वॉर्डात दाखल करण्यात आलं आहे.

माण-खटावचे भाजपचे आमदार जयकुमार गोरे साताऱ्याहून आपल्या मतदारसंघाकडे येत असताना त्यांची फॉर्च्युनर गाडी 30 फूट खोल खड्ड्यात कोसळली. आज पहाटे 3.30 वाजता साताऱ्यातील फलटण येथील मलठण येथे हा भीषण अपघात झाला.

हे सुद्धा वाचा

चालकाचं कारवरील नियंत्रण सुटल्याने त्यांची कार खोल खड्ड्यात कोसळली. या भीषण अपघातात जयकुमार गोरे यांनाही बराच मार लागला आहे. त्यांच्या छातीला, पाठीला आणि हाताला मार लागल्याचं सूत्रांनी सांगितलं.

गोरे यांच्यासोबतच्या तिघांना जबर मार लागला आहे. या तिघांना बारामतीच्या खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. तिघांची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती पोलिसांनी दिली. जयकुमार गोरे यांच्यावर आधी साताऱ्यातील रुग्णालयात उपचार करण्यात आले.

पण त्यानंतर त्यांना 8 वाजेच्या दरम्यान त्यांना रुबी रुग्णालयात आणण्यात आलं. त्यांना विशेष रुग्णवाहिकेतून आणण्यात आलं. यावेळी त्यांच्या हाताला सलाईन होती. तोंडाला ऑक्सिजन लावलेला होता. तसेच हाताला आणि छातीला मार लागलेला दिसत होता. डॉक्टरांचा ताफाही त्यांच्यासोबत होता.

त्यानंतर गोरे यांना स्ट्रेचरवरून रुबी रुग्णालयाच्या अतिदक्षता वॉर्डात दाखल करण्यात आलं. त्यांची तब्येत स्थिर आहे. पण पुढील उपचारासाठी त्यांना रुबी रुग्णालयात आणण्यात आल्याचं सांगण्यात आलं. यावेळी भाजपचे आमदार राहुल कुल आणि गोरे यांचे कुटुंबीय उपस्थित होते.

दरम्यान, जयकुमार गोरे यांची कार ज्या खड्ड्यात पडली होती, त्या खड्ड्यातून ही कार बाहेर काढण्यात आली. क्रेनने ही कार बाहेर काढण्यात आली. यावेळी बघ्यांची मोठी गर्दी झाली होती. कार चालकाचं नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाला असावा. कारला कोणत्याही वाहनाने धडक दिल्याची माहिती नाही. या प्रकरणी अधिक तपास सुरू आहे, असं पोलिसांनी सांगितलं.